४९. हृदयसरोवर
काय झाले हरणीला?
रडताना राहीचना
जोजाऊनी थकले मी
नीज डोळा येईचना
दिस सरे रजनीही
अंधाराचा लेई शेला
अंगणात तुळशीला
घरोघरी लागे दिवा
रानातून, वनातून
परतली गाईगुरं
इवलाली काऊचिऊ
विसावली फांदीवर
पारावर पिंपळाची
थांबली ग सळसळ
झोपण्याच्या वेळी पण
किती तुझी धावपळ!
रात किती झाली बघ,
झोपेची ग सरे वेळ
आवरिता आवरेना
किती ग तू अवखळ?
दुड्ढुडू धावताना
कितीकदा अडखळे
बाललीला पाहताना
दिवसाचे श्रम पळे!
खुदूखुदू हासताना
राग मनातला पळे
सावळ्या ग गालावर
पडतसे गोड खळे!
बोबडे ग बोलताना
ताता-ताता म्हणत्येस
हृदयीचे सरोवर
काठोकाठ भरतेस!
४.८.१९६८