५०. येऊ नको अशी!
येऊ नको धस्सदिशी
भरलेल्या पायानं
झोप माझ्या तान्हुल्याची
चाळवेल ग!
येऊ नको अशी
दुपारच्या वेळेला
बाळ गाढ झोपलेला
कुशीमध्ये
येऊ नको ग अशी
तिन्ही सांजेच्या वेळेला
बाळ माझा रडतो ग
एकसारखा
येऊ नको ग अशी
कडी वाजवीत रातीला
दचकेल ग बाळ माझा
पाळण्यातला
येऊ नको ग अशी
भलत्या सलत्या वेळेला
बाळ माझ्या मांडीवर
पदराखाली
येऊ नको ग अशी
सकाळच्या वेळेला
बाळ माझा गुटीसाठी
भुकेलेला
येऊ नको ग अशी
रिकाम्या हातानं
भरलेल घर माझं
सोनपावलानं!
जुलै २००१
दहिटणे