६. किती दिसांनी
किती दिसांनी आज बुडाला गंगाजळी सूर्य
क्षितिजावरती झणी उडाले सलज्ज द्विज सर्व
किती दिसांनी आज देखिला शुक्राचा तारा
ब्राह्ममुहूर्ती स्पार्शून गेला थंडगार वारा
किती दिसांनी झक्क लाजली प्राचीवरती उषा
स्वप्नरंजनी दंगच होती चंद्रम्यासह निशा
किती दिसांनी आज मिळाल्या अज्ञ दोन वाटा
पवित्र-मंगल करून गेल्या गंगेच्या लाटा
किती दिसांनी आज लाभला दर्याला तीर
मनामनांच्या भावुकतेला झणी लोटला पूर
किती दिसांनी आज बैसलो प्राजक्ताखाली
कुणा न कळले मृदुल कळ्यांची फुले कशी झाली...!
८.१२.१९७९