५२. ममता
रवी गेला विसाव्याला आले अंधारुन
खेळूनीया बाळ नाही आला परतून
दिवेलागणीची वेळ गेली गे सरून
तहान-भूक आज बाळ गेला विसरून
परतली गाईगुरे आणि पाखरेही
शोधण्याला आसमंत मन वेध घेई
अंगणात तुळशीला होता सांजवात
शुभंकरोतिला आज नाही सान हात
आकाशात उगवली चांदोबाची कोर
कुठे गेला बाळ माझा? जिवा लागे घोर
देवाजीची आळवणी जाहली अपार
नयनीच्या आसवांना राहिला ना पार!
धावूनिया बाळ आले हाकारीत आई
निनादला शब्द कानी स्तब्ध बने आई!
आनंदाच्या आसवात माता सुखावली
श्रावणाच्या वर्षावात बिजली हासली!
१०.२.१९६१
सोलापूर