५३. बाई या पावसानं
बाई या पावसानं
केला ग सारा घोळ
पाळण्यात झोपलेला
माझा तान्हुला ग बाळ
कामा निघाली माऊली
तिला आभाळ साऊली
काळं आभाळ उठलं
कसं पावसानं गाठलं?
विरलेलं जीर्ण वस्त्र
भिजूनिया झालं चिंब
गारठलं सारं अंग
डोळियांत येती थेंब
अशा उभ्या पावसात
केली भाताची लावणी
दाम घेऊन पदरात
वाट चालते अनवाणी
आली धावत-पळत
इवलाल्या खोपटात
बाळा लावीत उराशी
आसवाला दिली वाट...
जुलै २००१