५४. दिवाळी

आली दिवाळी पेठेमध्ये खरेदीची गर्दी
मोठ्या आवाजात दिधली फटाक्याने वर्दी

भल्या पहाटे दारी अंगणी पणत्या उजळती
उल्हासाने मुली-बाळी मग रांगोळ्या रेखिती

उंच आकाशी झणी टांगतिल आकाशकंदील
दीपावलीचे दिवस मजेचे उडवी मस्त धमाल

पहाटेच्या मंगलवेळी अभ्यंगस्नान
सर्व सणांमध्ये भारतीयांचा विशेष हा सण

याच सणाला मुली नवोढा माहेरी येती
दिवाळसण मग पहिला वहिला साजराही करिती

लाडू-करंजा-चकली-चिवडा फराळ दणक्यात
सान, थोर, सारे विहरती नवीन कपड्यांत

सांजसकाळी घरीदारी मग पणत्यांची रांग
उजेडात त्या उजळून निघतो मनीचा आनंद

लक्ष्मीपूजन आणि पाडवा महत्त्वाचे दोन्ही
नवीन उद्योग, नवा आरंभ हो साधूनिया पर्वणी

नवीन साड्या-दागिन्यांनी नटल्या सुवासिनी
बंधू सख्याला ओवाळाया आतुरल्या भगिनी

दारू-फटाके आतषबाजी जोश नि उल्हास
चार दिवस हे दीपावलीचे आनंदी खास

दीप सुचवतो तुला माणसा, मूक असा संदेश
अंतरातल्या माणुसकीची जागवीत जा ज्योत

२०.१०.२००२
अनुक्रमणिकामागीलपुढील
५४. दिवाळी | भाव मनीचे उमलत राहो