५५. दिवाळी आली
आली दिवाळी आली दिवाळी
पणत्या लावा पुढील दारा
पाहुणा येईल गोरा गोरा
भाऊ माझा
आली दिवाळी आली दिवाळी
आकाशकंदील वरती टांगा
आल्या आल्या करतील दंगा
भाचे माझे
आली दिवाळी आली दिवाळी
उजळून निघेल रात्र सगळी
कन्या माझी साधी भोळी
येणार हो!
आली दिवाळी आली दिवाळी
पणत्या लावा तुळशीपाशी
लेक येणार माझी हौशी
सणाला हो!
आली दिवाळी आली दिवाळी
पणत्या लावा तीनशे साठ
जावयाचा होईल थाट
सणामध्ये
आली दिवाळी आली दिवाळी
फराळाची भरली ताटे
पाहुण्यांची गर्दी दाटे
सणामध्ये
आली दिवाळी आली दिवाळी
सुनबाई लागली कामा
परगावहून येणार मामा
नातवाचा
आली दिवाळी आली दिवाळी
दारुकामाची आतषबाजी
नातवंडे येणार माझी
सणासाठी
आली दिवाळी आली दिवाळी
उडवा फटाके दणादण
भाऊबीजेला येणार कोण?
भाऊ माझा
आली दिवाळी आली दिवाळी
रांगोळ्यांनी सजले अंगण
आज पाहुणा येणार कोण?
भाऊ माझा
आली दिवाळी आली दिवाळी
सणासाठी नात आली
आजी मनी सुखावली
नात पाहून
आली दिवाळी आली दिवाळी
पहाटेला अभ्यंगस्नान
ओवाळण्याला मिळतो मान
लेकीला हो!