५६. गेले ते दिन गेले!

सायंकाळी शुभं करोति
बसून सारे देवापुढती
वडीलधाऱ्या साऱ्यासाठी
नम्र होऊनी त्याच्यासाठी
नमस्कारास्तव जरा नमती
गेले ते दिन गेले!

आई-बाबा जुने झाले
मम्मी-पप्पा पिंटू बोले
काका-काकू जुने पुराणे
अंकल-आंटी नवीन नाणे
पिंकी, बंटी, सनी, मनी हे
नवीनतेचे खूळ माजले
गेले ते दिन गेले!

फिट पँट, फिट शर्ट
मुली करती बॉयकट
पंजाबीवर ओढणी नाही
लांडा स्कर्ट, अर्धे उघडे
अशा आजच्या युवती, बापरे!
आणि युवक?
केस वाढविती मानेवरती
कानात डूल नाकात चमकी
भरधाव गाड्या उडवीत जाती
या टीव्हीने वाटोळे केले!
गेले ते दिन गेले!

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार
विचार नाही आचार नाही
थांबायला वेळच नाही,
सारे कसे झटपट हवे
फास्ट फुड हवे नवे
तिकडचे सारे इकडे आले
गेले ते दिन गेले!

लाजायचे नाव नाही
नम्रतेचा भाव नाही,
चारित्र्याला ठाव नाही,
शौर्य-अस्मिता-स्वाभिमान
कशाशी खातात? माहित नाही
असे सारे आक्रित घडले!
गेले ते दिन गेले!

वाचनाची आवड नाही
संस्कृतीची चाड नाही,
कशा कशाची भीड नाही
आईवडिलाशी बोलायला
जरा सुद्धा सवड नाही
कुठलेच काम धड नाही,
इकडचे सारे टाकाऊ झाले
परदेसी संस्कृतीने वाटोळे केले
गेले ते दिन गेले!

जून २००३
अनुक्रमणिकामागीलपुढील
५६. गेले ते दिन गेले! | भाव मनीचे उमलत राहो