५७. मृत्यूचे स्वागत
या अशाच धूसर वेळी
नकोच कुणीही जवळी,
कधि न चुकावा होरा
यावा मृत्यूच सामोरा!
कर्पूरासम उडून जावी
मम मनातली भीती,
अन् अवचित जडावी
मरणावरती प्रीती!
वातावरणी प्रकाश येता
तिमिराने मग झणी लपावे,
अमंगल ते पळून जावे
मृत्यूसंगे मंगल व्हावे!
जीवनाची आसच वेडी
क्षणात सारी उडून जावी,
पवित्र मंगल अलौकिकाची
जिवा-शिवाची भेट घडावी!...
२१.३.२००१