५८. गाऊ कसे मी गीत!
गाऊ कसे मी गीत, रसिका, गाऊ कसे मी गीत?
या गीताचा राग कोणता?
मला न ते माहीत!
पूर्व दिशेला उजळती गगने
उठ माधवा उघडी लोचने
जागविण्या रे तुला यादवा
आळवितो मी भूप
घन घन घन हे गर्जत आले
धरणीवरती मेघ बरसले
चराचराला तृप्तच केले
आळविता मल्हार
दाटून येता तिमिर सभोती
तानसेन ते गायन करिती
नगरामधले दिवे लागती
गाता राग दीप
मोहनवेडी राधा भोळी
सूर ऐकते वेळी अवेळी
त्या सुरातच मिसळून जाते
श्वासाचे संगीत!
२३.७.२००५
शनिवार