५९. स्वप्नकळी

स्वप्नकळी मी स्वप्नकळी
स्वप्नामधल्या नगरीची मी स्वप्निल सोनसळी...

जीवन माझे स्वप्निल सुंदर
त्या स्वप्नातिल परी मी सुंदर
असो राव की कुणी कलंदर
त्या सकलांवर उधळित फिरते स्वप्नांच्या ओंजळी!

बालवयातील सुंदर जग हे
त्याच जगातिल स्वप्निल नभ हे
स्वप्निल तारे स्वप्निल वारे
स्वप्निल नयनांमधुनी फुलते स्वप्निल सोनकळी

प्रिय जनांच्या स्वप्न मीलनी
गुणगुणते मी स्वप्निल गाणी
स्वप्न पाहते दिवसा कोणी
स्वप्नरंजनी रंगुन जाते स्वप्निल प्रीत खुळी!

स्वप्न कुणाचे ऐश्वर्याचे
उच्च कलेचे, जगत् कीर्तीचे
आशेच्या हिंदोळ्यावर बसुनी
सुखस्वप्नांचे फेकित जाळे, रमते स्वप्नजळी

आशेच्या स्वप्नावर जगणे
मनुज चिरंतन एकच गाणे
सत्याहुनी स्वप्न है देखणे
मनुजासाठी विणीत बसतो मी स्वप्निल जाळी..

२२.१२.१९८०
अनुक्रमणिकामागीलपुढील
५९. स्वप्नकळी | भाव मनीचे उमलत राहो