७. प्रीतीची ओढ

ती - मला न कळले कसे जाहले मन वेडे हळुवार
प्रीतीची ओढच ही अनिवार...
आले सजणा, तुझियासाठी सोडुन मी घरदार
लागे ओढ मनी अनिवार..

प्रीतीची...

तो - नको साजणी नको असा गे, करू नको अविचार
जाऊ दे रविला सागरापार...

प्रीतीची...

ती - तव नयनातिल भाव आगळे आनंदाने बहरून आले
हृदयवीणेची तार छेडिता उठले नव झंकार...

प्रीतीची...

तो - नकोस लावू जीव असा गे, नकोस लावू जीव फुका
प्रीतनदीला जरा असू दे अमीत-संयमधार...

प्रीतीची...

ती - अधिर मनाचा अवखळ पक्षी धुंद होऊनी नाचनाचतो
फिरकी घेऊन मनी रेखितो भावनक्षी हळुवार...

प्रीतीची...

तो - नकोच राणी नकोच झुरणे, मुक्त होऊ दे आज बंधने
अनिर्बंध या दोन जिवांची झणी लागू दे तार...

प्रीतीची...

दोघे- प्रीतीची ओढच ही अनिवार...

२२.७.१९८३
अनुक्रमणिकामागीलपुढील
७. प्रीतीची ओढ | भाव मनीचे उमलत राहो