८. वाट

घडी घडी येते मला
सये, तुझीच सय
ये ग आता सदनाला
करू नको हयगय

सरलं हस्ताचं ऊन
बाप गेला ग जेवून
गेला दसरा होऊन
आला दिवाळीचा सन

तरी नाही आलीस
माझी लाडकी सगुना
घोर लागला जिवास
कशी अजून येईना?

राबते भिक्यासंगं
त्याची अस्तुरी रकमीन
कोन येईल ग माझी
कांदा-भाकर घेऊन?

सरली दिवाळी झालं
तुळशीचं लगीन
दाट उभं माझं पीक
कसं आलं तरारून!

होती इवली रोपटी
आता झालिया ग घाटी
उभ्या माझ्या शिवारात
कणसाची झाली दाटी

आला आला ग सये
कापणीचा हंगाम
घालू आता कुठवर
माझ्या जीवा लगाम?

झाली खळणी मळणी
रास घातली पिकाची
आली लक्षुमी घरात
सोनियाच्या पावलांची

भरलेलं घर सुनं
उरी माझ्या कालवतं
वाटची झाली सीमा
नाही आता राहवत...

१३.१०.१९५८
उस्मानाबाद
अनुक्रमणिकामागीलपुढील
८. वाट | भाव मनीचे उमलत राहो