९. स्वप्नात येऊनी जा

स्वप्नात येऊनी जा
सत्यात येऊनी जा
ही स्पंदने मनाची वदतात भेटुनी जा...

ती रात्र चांदण्याची
मंत्रात भारलेली
येईल ना पुन्हा ती
हृदयात कोरलेली?
ती साथ चांदण्याची सत्यात देऊनी जा...

बागेत रातराणी
मदमस्त बहरलेली
धुंदीत तुजसवे मी
ती रात्र जागलेली
त्या धुंदशा स्मृतीचा क्षण एक उजळुनी जा...

हा मंद मंद वारा
प्रीतीत रंगणारा
हा आसमंत सारा
स्वप्नी चितारलेला
स्वप्नातल्या कळीला अवचित भेटुनी जा...

ही आस या मनीची
बघ चैत्रवेल झाली
स्वप्नातल्या कळीला
हलकेच जाग आली
चैत्रातल्या कळीला अधरेच फुलवुनी जा...

२१.१२.१९८०
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
९. स्वप्नात येऊनी जा | भाव मनीचे उमलत राहो