अभिप्राय
मनुष्याचे मन विविध रंगी भावनांनी भरलेले आहे. त्यामुळे जगात चैतन्य आहे, जिवंतपणा आहे. उल्हास आहे, जोष आहे, आनंद आहे. जर या भावना नसत्या, मन नसतं तर मनुष्य यंत्रवत् झाला असता. मनुष्याचे मन कधी अती हर्षित होतं तर दुसऱ्या क्षणी दुःखी होतं, कधी मनुष्याच्या मनात मीलनाचे भाव असतात, कधी विरहाचे भाव असतात, कधी रडके तर कधी हसरे भाव! मनुष्य अशा अनेकविध भावनांनी ओतप्रोत भरलेला आहे, आणि या मनाचे विविध भाव पंडित नायगावकरांनी अचूकपणे आपल्या 'भाव मनीचे उमलत राहो' या कवितासंग्रहातून प्रकट केले आहेत. मनाचा चंचलपणा सांगताना कवी नायगावकर म्हणतातः -
मन पाखरू पाखरू
त्याला किती हो आवरू
झणी दूर दूर पळतसे
त्याला कसे मी सावरू ?
मन हे पाखरासारखे आहे. पाखरं ज्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर रहात नाहीत, सतत ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर विहार करतात; त्याप्रमाणे मन हे एका क्षणी धरतीवर असते तर दुसऱ्या क्षणी दूर आकाशावर झेप घेते. तेही पाखरासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर संचार करून येते. त्याला कितीही स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी ते काही काळापुरतेच स्थिर राहते व काही क्षणांनंतर दूर दूर पळते. त्यामुळे 'त्याला मी कसे सावरू?' असे कवी नायगावकर या पंक्तीमधून विचारत आहेत.
नायगावकर मनाचे भाव उमलत असताना कवितांमधून नात्याचे रेशमी बंधही साकारतात. नात्यातील गोडवा गाताना 'मी न कोणा सांगायची' या कवितेत ते बाबांना रात्रंदिन सावली देणारे आम्रतरू म्हणतात, तर आईला अविरतपणे सुगंध देणाऱ्या जाईच्या वेलीची उपमा देतात. बाहेर गेलेली मुलगी घरी परत येणार आहे, तिची वाट पाहणाऱ्या आईच्या हृदयस्पर्शी मनाचे कथन 'लेक येणार माझी' या कवितेतून मनाला स्पार्शून जाते. नायगावकरांच्या या कवितेत आई पावसाला म्हणत आहेः -
नको येऊस पावसा असा वेळी-अवेळी
लेक येणार माझी आज घरी सांजवेळी
मुलीच्या विरहाने व्याकुळ झालेली आई मुलीची घरी परतण्याची आतुरतेने वाट पहात आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे ती पावसाला बजावत आहे की, 'हे पावसा, असा वेळी अवेळी येऊ नको. माझी लाडकी लेक सायंकाळी येणार आहे. जर तू असा वेळी अवेळी बरसत राहिलास तर तिला यायला उशीर होईल. त्यामुळे तू थोडा धीर धर.' कवी या ठिकाणी आईच्या कोमल भावनांचे रंग या कवितेतून सादर करतात. कवी नायगावकर ह्यांच्या भाव मनीचे उमलत राहताना आणखी एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या काव्यविषयात वेगळेपणा आहे. वैविध्य आहे. कवीने मानवी जीवनातील कटू सत्यावरही आपली लेखणी वळवली आहे. ते म्हणतातः-
दोन दिवसांची रंगत न्यारी
दोन दिसांची दुनिया सारी
मग सरे येथील सुगी
माणसा 'जायचे रे दुरी' म्हणून आपल्या क्षणभंगुर जीवनाचे खरे स्वरूप सांगतात.
भारत आमुचा छान
होऽ भारत आमुचा छान
ध्वज तिरंगा फडकत राहून दाखवी आपुली शान
असे म्हणत आपले देशप्रेम, देशाबद्दलचा अभिमान 'भारतगौरव' या कवितेतून व्यक्त करतात.
कवी नायगावकरांच्या कविता मनाला भावून जातात. कवितांना नैसर्गिक सौंदर्य आहे. म्हणून म्हणावेसे वाटतेः -
गोड गोजिऱ्या गाली अवचित
खळी उमटते जशी
धकाधकीच्या अशा जीवनी
कविता फुलते अशी...
खरंच, नायगावकर कविता उमलण्यासाठी फक्त कविमन असावे, असे सांगतात. त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज भासत नाही. मनाचा सुंदरपणा कवितेला आकार घेण्यास पुरा असतो. त्यांच्या कविता मनाला भावून जातात. कवी नायगावकरांच्या कवितासंग्रह वाचताना आणखी एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही की, त्यांच्या काव्यविषयात वैविध्य आहे. अगदी खाजगी भावनांना शब्द देताना नायगावकरांची कवित लाजत नाही, बुजत नाही. हा धीटपणा त्यांच्या कवितेसाठी एक सुचिन्ह आहे. कवी नायगावकरांच्या कवितासंग्रहाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! मी त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो.