१०. जाणिवेची जाग

  रुक्माई माऊली आणि विठ्ठलपंत या उभयतांनी आपले देह विसर्जित केले. जलसमाधी घेतली. पण तिकडे पर्णकुटीत काय घडले असेल !

  पहाटे निवृत्ति जागा झाला. पाहतो तर आईबाबा नाहीत. त्याने ओळखले. पण तो ओठ मिटून गप्प बसला. ज्ञानदेव जागा झाला. त्याला निवृत्तिने घट्ट मिठी मारली. ज्ञानदेव काय समजायचे ते समजला. नंतर सोपान आणि मुक्ताई जागी झाली.

  ज्ञानदेव मुक्ताईची समजूत घालीत होते. इंद्रायणी भिजल्या स्वरात गात होती...

बालजिवांना कळली नाही रात कशी सरली !
निवृत्तीला जाणिवेची जाग प्रथम आली! ।। ध्रु. ।।

भिरभिर डोळे घरभर फिरले शोधित मातेला
भाळावरती वात्सल्याचा स्पर्श नाही झाला
व्याकुळतेने उरात तेव्हा ममता आनंदली
तोच निरागस लडिवाळी ती मुक्ताई जागली... ।।१।।

मुक्ताईला आज दिसेना मातेचे नितकर्म
सडा नाही अन् रांगोळीचे ना ते गोपद्म,
ज्ञानियाचे वदन कोवळे क्षणैक झाले म्लान
सोपानाला कळून आली वाट नवी येथली... ।।२।।

धीर देऊनी मुक्ताईला पुशी लोचनाला
ज्ञानियाचा हात धरूनी नाथ पुढे झाला
छत्र संपले मायपित्याचे उरला ना वाली
देवरूप हे अंश परंतु अनाथ हो झाली... ।।३।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
१०. जाणिवेची जाग | गीत ज्ञानदेवायन