९. मरणसोहळा

  विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला आता जगणे अशक्य झाले होते. ब्रह्मवृंदाचा ससेमिरा अजून थांबला नव्हता. जेव्हा ही बाळे इंद्रायणीकाठी जात, तेव्हा त्यांच्याकडे पाहून ब्रह्मवृंद म्हणत - 'बाकी विठ्ठलपंत खरेच बुद्धिमान हो! संन्यासी होऊन पुन्हा गृहस्थाश्रमाची अभिलाषा !'

  पाठोपाठ दुसरा आवाज- 'वा! वा! वा! या संन्याशाने मुलांची नावे किती अर्थपूर्ण ठेवलीत ! निवृत्तिनाथ, म्हणजे त्याने आताच संन्यास घ्यावा काय?'

  तिसरा आवाज- 'अहो, संन्यास घ्यायची आवश्यकताच नाही. संन्याशाची मुले संन्याशीच की!'

  पुन्हा पहिला आवाज- 'ज्ञानेश्वर. वा! पण याला बाराखडीची ओळख नाही अन् म्हणे ज्ञानेश्वर !'

  यावर कपटी हास्याची कारंजी.

  हे सारं सारं विठ्ठलपंतांना कळे. ते दीर्घ उसासा सोडीत. त्यांनी ठरविले. पैठणला ब्रह्मवृंदाकडे जाऊन शुद्धिपत्र आणायचे.

  विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी पैठणचा रस्ता धरला. तेथे जाऊन त्यांनी तेथील ब्रह्मवृंदास नम्रतेने विचारले, 'आदरणीय ब्रह्मवृंद, मी संन्यासधर्म मोडला, तो गुरूच्या आज्ञेवरून. पण माझ्या मुलांनी कोणता गुन्हा केला म्हणून त्यांना हे कठोर शासन ? माझ्या मुलांच्या मौजीबंधनासाठी मी शुद्धिपत्र मागायला आलो आहे.'

  शास्त्रीपंडितांनी सर्व पोथ्या, ग्रंथ-पुराणे उलटून पाहिली, कुठेच काही सापडले नाही. शेवटी त्या पंडितांनी निर्णय दिला शास्त्रात याला प्रायश्चित्त नाही. यावर शुद्धिपत्र म्हणजे देहान्त प्रायश्चित्त. हेच शुद्धिपत्र! चला, चालते व्हा येथून.'

  विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मूकपणे परत आले व त्या उभयतांनी आपले देह इंद्रायणीत विसर्जित करण्याचे निश्चित केले.

  आळंदीत आल्यावर एके दिवशी, रात्री सर्व बाळे झोपली असताना, या बाळांचे मायतात देहविसर्जन करण्यासाठी इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले. त्याक्षणी अज्ञातातून सूर उमटले...

निजबाळांना करून पोरके मायतात चालले
कठार झाली नियतो केसी, आसमंत बोलले...।। ध्रु.।।

चारी बाळे झोपडीत त्या गाढ झोपलेले
थरथरत्या हातांनी मग दारही लावियले
कढ मायेचे भरून येती उरी दाटलेले
आता परतुन येणे नाही, शब्द गोठलेले... ।।१।।

तिमिर दाटला आज सभोती भरला काळोख
काळोखातुन वाट दिसेना, मनही ठेचाळत
वाट चालती इंद्रायणीची विठ्ठलपंत-रुक्मिणी
मनःपाखरू फडफड करते, हदयी पाणावले... ।।२।।

इंद्रायणीच्या डोही येता स्तब्धच ते जाहले
दूर दूर त्या झोपडीकडे मूकपणे पाहिले
देह त्यागिले त्या दोघांनी, जीवन ते सरले
इंद्रायणीचे जळही तेव्हा अवचित थरथरले... ।।३।।

असा अलौकिक क्षण निष्ठुर तो जीवन-अंताचा
इंद्रायणीने आज पाहिला सोहळाच मरणाचा
प्रायश्चित्त हे असले कसले जीवावर उठले !
कैसी झाली आज पोरकी ती चिमणी बाळे !... ।।४।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
९. मरणसोहळा | गीत ज्ञानदेवायन