१२. पैठणास प्रया

  मुक्ताईची आळवणी ऐकून ज्ञानदेवाने दार उघडले व आनंदातिशयाने मुक्ताईला मिठी मारली. तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरविला. ते म्हणाले. 'ताई, तुझ्या मायेने प्रेमाने माझी समाधी भंग पावली. ते ऐकून निवृत्तिनाथ गंभीरपणे म्हणाले, 'ज्ञानेश्वरा, तुला अशी निरंतराची समाधी लावून चालणार नाही. समाजाने आपली अशी दुष्ट छळवणूक केली. नावाप्रमाणेच तुला आता कार्य केले पाहिजे. धिक्कार असो अशा समाजाचा, की ज्याने माणुसकीला तिलांजली देऊन धर्मशास्त्राच्या मशाली नाचवल्या. धर्मशास्त्राचा कंठरव करणारे हे ब्रह्मवृंद, त्यांनीच आपल्या आई-बाबांची हत्या केली. ज्ञानेश्वरा, तुला आता यापुढे गप्प बसून चालणार नाही. ऊठ, जागा हो, तुझा सर्वात्मभाव साऱ्यांना कळू दे.'

  निवृत्तिनाथांना गहिनीनाथांकडून नाथपंथाचा अनुग्रह आधीच मिळाला होता. त्यांनी ज्ञानदेवांना नाथपंथाची दीक्षा दिली. ज्ञानेश्वरांना आत्मसाक्षात्कार झाला.

  'संन्याशाची मुले' अशी त्यांची हेटाळणी उच्च वर्गाकडून होतच होती. शेवटी पैठणच्या ब्रह्मवृंदाकडून शुद्धिपत्र घेण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. त्यांनी पैठणचा रस्ता धरला. ऊन पाऊस, वादळ वारा यांची तमा न बाळगता ही भावंडे पैठणचा रस्ता जवळ करीत होती...

आळंदीचे बालयोगी हे मार्ग क्रमू लागले
शुद्धिपत्र ते घेण्यासाठी पैठणला चालले ! ।। ध्रु. ।।

जाणिवेने निवृत्ति हा पुढे पुढे चाले
ज्ञानियाचा हात धरूनि मुक्ताई बोले
वाट कंटकी सोपानाला कळूनिया आले
शुद्धिपत्र ते घेण्यासाठी... ।।१।।

ऊन पोळते, पाय भाजती, होते लाही लाही
वादळवारा, पाऊसधारा, तमा मुळी नाही
मार्ग चालती खडतर ऐसा, लवलाही, बाळे
शुद्धिपत्र ते घेण्यासाठी... ।।२।।

वाट संपली दिसु लागले पैठण ते गाव
गोदावरीचे जळ प्राशूनि शांत होई भाव
संन्याशाची मुले म्हणूनि किती किती सोशिले !
शुद्धिपत्रासाठी आता पैठणला आले... ।।३।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
१२. पैठणास प्रया | गीत ज्ञानदेवायन