१३. आज हे जीवित धन्य झाले...

  शुद्धिपत्रासाठी हे बालयोगी पैठणला आले, तेथील उच्चपदस्थ ब्राह्मणाकडे शुद्धिपत्राची मागणी केली. तेव्हा ब्रह्मवृंद म्हणाले, 'शुद्धिपत्र अवश्य मिळेल. पण तू स्वतःला ज्ञानेश्वर म्हणवितोस, तर हा पहा, समोरून रेडा चालला आहे; त्याला फटके मारले तर त्याच्या वेदना तुला होतील का? तुझ्या पाठीवर वळ उठतील का? तरच तू खरा ज्ञानेश्वर!' ज्ञानेश्वरांनी डोळे मिटून घेतले. रेड्याच्या पाठीवर आसुडाचा फटकारा बसताच, इकडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर वळ उठले. ते पाहून ब्रह्मवृंद म्हणाले, 'हा काही सर्वात्मभाव नाही. काहीतरी जादूटोणा, गौडबंगाल आहे. या रेड्याच्या मुखातून वेद बदवशील तरच आम्ही तुला खरे मानू व शुद्धिपत्र देऊ.'

  ज्ञानेश्वरांनी रेड्याकडे स्नेहार्द्र दृष्टीने पाहिले. रेड्यावर कृपादृष्टी टाकून त्याला ऋग्वेद म्हणण्याची आज्ञा केली. त्याबरोबर रेड्याच्या मुखातून वेदांच्या ऋचा बाहेर पडू लागल्या. पुढे क्रमाने संहिता, ब्राह्मण्य, आरण्यके, सूत्रादी-नियुक्त शिक्षा वगैरे सर्व अंगे रेड्याने म्हटली. ते पाहताच सारी सभा थक्क झाली. ब्रह्मवृंदाचा फणा गळून पडला. सारे ज्ञानेश्वराच्या चरणांवर लोटांगण घालू लागले. आजपर्यंत झालेल्या उपहासाची क्षमा मागू लागले व म्हणू लागले, 'आमचे अक्षम्य अपराध पोटात घालावेत आणि आमच्यावर दया करावी. या विश्वातील जड जीवांचा व सर्वांचा उद्धार करण्यासाठीच आपण अवतीर्ण झाला आहात. आपण नित्य शुद्ध आहात. साऱ्या विश्वाचा उद्धार करणारे आपणच खरे उद्धारक आहात. आम्ही आपणास कोणते नि कसले प्रायश्चित्त देणार?' असे म्हणून ज्ञानरायाच्या चरणी पंडित-शास्त्री व सारे मान्यवर लोटांगण घालू लागले.

  सभेचे चित्रच पालटले. या भावंडांचा सत्कार, जयजयकार होऊ लागला. अशा प्रकारे गावोगावी, ठिकठिकाणी ज्ञानदेवादी भावंडांचे सत्कार होऊ लागले. सर्वसामान्य जनतेला ज्ञानदेवाचे कौतुक पाहून धन्य धन्य वाटले. ते आनंदाने गाऊ लागले...

आज हे जीवित धन्य झाले
ओवीमधुनी सहस्रदलाचे कमल नवे विकसले ।।। ध्रु.।।

जनसंमदर्दी आनंदाने
भावभक्तीचे बीज पेरिले
सात्त्विकाच्या मनी बहरले भक्तिरसाचे मळे... ।।१।।

भाववेल ही फुलून आली
अमृतवर्षावाने न्हाली
चैतन्यासह बहरा आली अद्वैताची फुले... ।।२।।

कैवल्याची आकाशगंगा
मीन त्यातले पोहू लागले
शीत चंद्रमा बरसू लागे भक्तीचे चांदणे... ।।३।।

बीजापोटी जशी आसक्ती
फळास लाभे ती निवृत्ती
प्रवृत्तीला निवृत्तीचे वेड असे लागले... ।।४।।

निशा-तमाने व्योम व्यापिता
घनमेघासी वात स्पर्शिता
मृदगंधाच्या नव गंधासम तेज नवे प्रगटले... ।।५।।

शांतिरसाचा प्रेरक कर्ता
सिद्धि-संकल्पाचा दाता
निरपेक्षी नारायण त्याला संचित हे वाहिले... ।।६।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
१३. आज हे जीवित धन्य झाले... | गीत ज्ञानदेवायन