१४. चांगदेव पासष्टी
ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची कीती चांगदेवांपर्यंत गेली. चांगदेव हे वयोवृद्ध त्यांची दीडशे वर्षांची तपश्चर्या होती. वाघ-सिंहासारखे हिंस्र प्राणीसुद्धा त्यांनी आपल्या तपश्चर्येने, तपोबलाने अंकित केले होते. हे प्राणी त्यांच्या जवळ येऊन बसत. असे तपोनिष्ठ चांगदेव, ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून, चाबकाप्रमाणे हातात मोठा साप घेऊन भूतगणांच्या मेळ्यासह आळंदीस येत होते.
ज्ञानेश्वर व भावंडे एका भिंतीवर बसली होती. चांगदेवासारखे महान तपस्वी, वयोवृद्ध आपल्या भेटीत येत आहेत हे समजताच ज्या भिंतीवर बसले होते, ती भिंतच ज्ञानेश्वरांनी चालवली. चांगदेव महाराजांना भितीसहित सामोरे गेले. एवढी मोठी प्रदीर्घ काळाची चांगदेवांची तपश्चर्या पण त्यांचा अहं अजून कायम होता. हे ज्ञानेश्वरादी भावंडांनी ओळखले. कारण चांगदेवांनी आपण येत आहोत असा निरोप पाठवून सोबत पत्रही दिले होते. पण ते पत्र कोरेच होते.
त्या कोऱ्या पत्राला उत्तर ज्ञानदेवांनी दिले. ते उत्तर म्हणजेच चांगदेव पासष्टी !
ज्ञानियाचा राजा दावी नवलवर्तमान
बसून तीवर भिंत चालवी जड अचेतन...।। ध्रु. ।।
पत्र देखुनी चांगदेवाचे बोले मुक्ताई
डोके अजुनी कोरे यांचे नवल वाटते बाई
काय म्हणावे अशा यतीला, कसे आततायी
किती शतकांचे तप परंतु, नावरे अजुनी मन... ।।१।।
नाही जिंकिले त्यांनी अजुनी राग लोभ हे रिपू
वृथा वल्गना उगा तयांच्या, दुनियेला जिंकू
अवाक् झाले सारे पाहुन डोळे लागले दिपू
अन् गर्वाचा फणा गळाला, येई हो शरण... ।।२।।
उत्तर देऊन पत्रालाही, वदे ज्ञानदेव
अजुनी त्यांनी जागविला ना मनातला देव
भिंत चालली, चमत्कार हा पाही चांगदेव
गळून गेला सामर्थ्याचा वृथा अभिमान... ।।३।।
त्या योग्याला उत्तर देती ज्ञानदेव इष्ट
सहजच झाल्या उत्तरात त्या ओव्या पासष्ट
चांगदेवा झणी उमजली ओवीतुन समदृष्टी
त्या ओव्यांना आजही म्हणती 'चांगदेव पासष्टी' !... ।।४।।