१५. नाथ सांगती ज्ञानियाला

  निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडे प्रवरातीरी नेवासा येथे आली. तिथे महादेवाच्या देवळात ही मंडळी उतरली. भजनं, कीर्तनं होऊ लागली.

  एके दिवशी सकाळीच निवृत्तिनाथ ज्ञानदेवाला म्हणाले, 'ज्ञानोबा तू एक करायला हवे. रामायण, महाभारत, पुराणे, गीता हे सगळं संस्कृतात आहे. भोळ्याभाबड्या सर्वसामान्य जनतेला संस्कृत कसे समजणार? तर, तू हा परमार्थविचार प्राकृत भाषेत आण. सगळ्यांना मराठी भाषेच्या सावलीत बसून परमार्थाचे अमृत पिऊ दे.'

नाथ सांगती ज्ञानियाला ज्ञानी तुजला केले रे,
त्या ज्ञानाचा दीप घेऊनी जनसामान्या जागवी रे ! ।। ध्रु. ।।

गहिनीनाथांनी मज दिधली अद्वैतज्ञानाची ही दीक्षा
'अहं ब्रह्मास्मि' या तत्त्वाची घेऊन आलो अद्भुत शिक्षा
या ज्ञानाचे बीज घेऊनि जनी मानसी रुजवी रे... ।।१।।

स्थितप्रज्ञ अन् ज्ञानवंत तू, शिष्य एकला भाग्यवंत तू
उकलून दावी सर्व जगाला आत्मज्ञानी गूढ रे
या ज्ञानाची ज्योत घेऊनि सर्व जगाला उजळी रे... ।।२।।

तव ज्ञानाची ज्योत राहू दे तिन्ही जगी या तेवत रे
उजळून निघतिल सारी गगने ज्ञानाच्या नव प्रकाशात रे
सकल जनांना प्राशन करू दे गीतेमधले अमृत रे... ।।३।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
१५. नाथ सांगती ज्ञानियाला | गीत ज्ञानदेवायन