१६. युद्ध हे द्वैत-अद्वैताचे

  प्रवरातीरी नेवासा येथे महालया मंदिरात असलेल्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसले आहेत. समोर निवृत्तिनाथ आहेत. सोपानदेव, मुक्ताबाई आहेत. समोर सर्व संतजनांचा मेळा बसला आहे. निवृत्तिनाथ ज्ञानदेवाचे केवळ भाऊ नव्हते. ते गुरूही होते. ज्ञानदेवांनी निवृत्तिनाथांच्या पायावर डोकं ठेवलं. गीतेवरील टीकेला प्रारंभकेला.

  ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर ज्ञानदेव, एकेक ओवी सांगत आहेत आणि सच्चिदानंदबाबा ते लिहून घेत आहेत.

  .....आणि नवल वर्तले ! दुर्लभ ते सुलभ झाले.

  ज्ञानेश्वरांनी गीता मराठी भाषेत आणली. 'ज्ञानेश्वरी!' किती गोड ग्रंथ! जणू ईश्वराचं वरदानच !

  एवढी वर्षे झाली, पण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ अजून जन्मायचाय. मर्दमावळ्यांची साधीसुधी, खडबडीत, रांगडी मराठी भाषा. पण ज्ञानेश्वरांनी तिच्यातून अमृताचे झरे वाहवले. गीता हे सोनं आहे तर 'ज्ञानेश्वरी' हा त्या सोन्याचा सुरेख दागिना आहे.

  त्याचप्रमाणे ज्ञानरायांनी 'अमृतानुभव' लिहिला, 'चांगदेव पासष्टी' लिहिली.

  गीता याचा अर्थ गायन. गीतेत निरनिराळ्या विषयांचा ऊहापोह केला आहे.

  सुरुवातीला 'अर्जुनविषादयोग' सांगितला आहे.

  कौरव-पांडवांच्या युद्धाला सुरुवात होते आहे, अंध धृतराष्ट्राला संजय युद्धाचे वर्णन सांगत आहे...

संजय सांगे धृतराष्टाला वर्णन युद्धाचे
युद्ध हे द्वैत-अद्वैताचे ! ।। ध्रु.।।

अन्यायाच्या प्रतिकारास्तव
श्रीकृष्णासह पांडव उठले
भीमकाय तर उन्मन झाले
पार्थाच्या दुर्दम्य रथाला सारथ्य अनंताचे... ।।१।।

सिंहनाद ते भीष्म करिती
रणवाद्यांसह शंख वाजती
भयभीत होई सारी धरती
कौरव अवघे सज्ज होऊनी मैदानी ठाकले... ।।२।।

शौर्यबेलाने बाहू स्फुरता
पंडुसुतांचे शंख गर्जती
मंडल अवघे भेदुन जाती
उल्हासाने आजानुबाहू रणास अवलोकिती... ।।३।।

सगेसोयरे गोत्रज बघता
गलित होऊन पार्थ वदतो-
पूज्य गुरू हे भीष्म आमुचे
आप्त स्वकिया देऊ कैसे आव्हान युद्धाचे?... ।।४।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
१६. युद्ध हे द्वैत-अद्वैताचे | गीत ज्ञानदेवायन