१८. ज्ञानकर्म आचरा...
चौथ्या अध्यायात ज्ञानकर्म आणि संन्यासयोग सांगितला आहे. माहितगाराचे ज्ञान, अज्ञान, कर्म चांगल्या-वाईट गोष्टींचा तपशील, ज्ञानानंतर कर्माला बांधून न राहणे, सत्कार्याला चिकटून राहणे, अयोग्य कर्म टाळून सत्कार्याचीच कास धरणे, याशिवाय देहाच्या जंजाळात गुंतून न राहता, ज्ञानकर्माकडे दृष्टी ठेवून सतत मुक्तीचा ध्यास घेणे- यासाठी परमेश्वराला भजावे. कमलपत्राप्रमाणे पाण्यात राहून ते जसे अलिप्त असते, तसे प्रपंचाविषयी, त्यात गुरफटून न जाता त्यात अलिप्तता राखावी. अशी मनाची तयारी होण्यासाठी ज्ञानकर्म करीत राहिले पाहिजे...
षड्रिपूंनी वेढलेला देहाचा हा पसारा
ज्ञानकर्म हो आचरा... ।। ध्रु. ।।
बंधनाने बांधलेला जीव मुक्त हा करा
मुक्तीसाठी कर्म आणि ज्ञान हे हाती धरा
विश्वरूपी व्यापलेला एक तो आसरा, ज्ञानकर्म हो आचरा... ।।१।।
ज्ञानियांनी ज्ञानियाला आकळावे हो कसे ?
अमृताने अमृताला नोळखावे हो कसे ?
अंतरंगी रंगलेला एक श्रीरंगा स्मरा, ज्ञानकर्म हो आचरा... ।।२।।
समाधाने तृप्त होई, तोच योगी हो खरा
सुखदुःखे दोन्ही जेथ, नोहे तेथे अंतरा
पद्मपर्णी जळीलागी होय जैसे श्रीकरा, ज्ञानकर्म हो आचरा... ।।३।।
विवेकाचे चित्तालागी तेज दीप्तीचे पडे
भेदाभेद तिन्ही लोकी ज्ञानिया ना सापडे
पूर्व दिशे रवि येता नाश होय अंधारा, ज्ञानकर्म हो आचरा... ।।४।।
नितकर्म दीपापरी परि तो अलिप्त हा
आचरोनी कर्म सारे होतसे ज्ञानी महा
सांडूनिया मीपणाला तोच संन्यासी खरा, ज्ञानकर्म हो आचरा... ।।५।।
व्रतवैकल्ये, शरीर कष्टणे, तीर्थयाग अन् योगाचरणे
मंत्र-तंत्र अनुष्टानही करणे, सर्व त्यजूनि निष्काम कर्म हे
सेवाधर्म हा यज्ञच आता, ज्ञानकर्म हो आचरा... ।।६।।