३. आला योगिराज आला
गोदावरीच्या काठी असलेलं पैठण. पूर्वीचे प्रतिष्ठान. या प्रतिष्ठान नगरीचा महिमा फार मोठा. मोठमोठ्या विद्वानांचं ते माहेरघर. उत्तरेत जो मान काशीला, तो दक्षिणेत पैठणला. अजूनही पैठणला 'दक्षिण काशी' म्हणतात. संबंध दक्षिणेतून न्यायनिवाड्यासाठी लोक पैठणला यायचे. पैठण हे धर्माचे, न्यायाचे व्यासपीठ.
या पैठणहून आठ मैलावर गोदातीरी आपेगाव नावाचं छोटं गाव. आपेगावी कुलकर्त्यांचं एक भगवद्भक्त घराणं नांदायचं. शके ११२० च्या सुमारास गोविंदपंत नावाचा सत्पुरुष होऊन गेला. त्याच्या पत्नीचं नाव नीराबाई. गोविंदपंत चांगला व्युत्पन्न माणूस. त्या घराण्यावर विद्वत्तेचे संस्कार झालेले. मोठा आदरातिथ्यशील गृहस्थ. त्यामुळं आल्यागेल्याचा राबता फार.
ते जोडपं समाधानी दिसायचं. पण नीराबाईंच्या मनी खंत होती. पोटी लेकरू नव्हतं. अंगणातल्या गायीला दुसण्या देणारं वासरू पाहून, नीराबाईच्या डोळ्यात टचकन् पाणी यायचं. ते पाहून गोविंदपंत धीर देऊन म्हणायचे, 'चिंता कशाला करता ? देव सगळं चांगलं करतो.'
योगायोग मोठा सुंदर ! गोरखनाथांचे शिष्य गहिनीनाथ हे आपेगाव येथे आले. गोविंदपंतांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. या जोडप्याचा सेवाभाव पाहून गहिनीनाथ प्रसन्न झाले. गोविंदपंतांना त्यांनी आपल्या संप्रदायाची दीक्षा दिली. त्या दांपत्याला खूप आनंद झाला.
नीराबाईची व्रतवैकल्ये चालूच होती. आणि नवल वर्तले ! पंचेचाळीस वर्षांच्या नीराबाईंनी लाजत लाजत गोविंदपंतांना एक गुपित सांगितले. ते हात जोडून म्हणाले, 'देव दयाळू आहे!'
योग्यवेळी नीराबाईंना पुत्ररत्न झाले. त्यांच्या घरी पहिलावहिला पाळणा हलला. बाळाचं नाव 'विठ्ठल' ठेवल. म्हातारपणचं कौतुक नीराबाईंनी जिवापलिकडे जपलं. बाळ विठ्ठल रांगू लागला, चालू लागला, गोविंदपंतांचे बोट धरून बाहेर जाऊ लागला.
पैठणला धार्मिक प्रवचने ऐकायला गोविंदपंत जात. बरोबर ते विठ्ठलालाही घेऊन जात. पुढे त्यांनी विठ्ठलाची मुंज केली. त्याला धर्मशास्त्र-ग्रंथांच्या वाचनाची गोडी लावली. विठ्ठलाला अमरकोश, कौमुदी, त्रीसूपर्ण, पुरुषसूक्त हे सारं सारं शिकवलं.
गीतेचीही संथा दिली. संथा घेता घेता विठ्ठलानं विचारावं, 'बाबा, विविक्तसेवी म्हणजे काय?' गोविंदपंत सांगत,' अरे, विविक्तसेवी म्हणजे एकान्तात राहण्याची आवड असणारा.' मग विठ्ठलानं संध्याकाळी गोदेच्या काठी असलेल्या शंकराच्या देवळात जाऊन बसावं व आपल्याशीच गुणगुणावं. विठ्ठलाला एकान्त आवडू लागला. असाच एकदा तो देवळात बसला असताना काही तडीतापसी शंकराच्या देवळात उतरले. बराच वेळ विठ्ठलानं त्यांचं निरीक्षण केलं व विचारलं, 'तुम्ही असे गावोगाव का हिंडता?' ते म्हणाले, 'तीर्थक्षेत्रं पहावीत, संतांच्या संगतीत रहावं, देवाच्या भक्तीत तल्लीन व्हावं, देवाचे आवडते होण्यासाठी, देवाचं स्मरण करायला एकान्त लाभावा म्हणून आम्ही घरदार सोडून हिंडतो.'
शरीराबरोबर विठ्ठलाचं अध्यात्मही वाढत होतं. साहजिकच त्याच्या मनामध्ये तीर्थयात्रेचे विचार घोळू लागले. तो विचार विठ्ठलाने आईवडिलांजवळ बोलून दाखवला. त्यांच्या परवानगीने तो तीर्थयात्रेला निघाला.
विठ्ठलानं प्रथम द्वारका गाठली. तिथून पिंजरकतीर्थ, भालुकातीर्थ, गिरनार अशी तीर्थे पहात तो सप्तशृंगीवर आला. तिथं त्यानं आदिमायेच्या पायावर डोकं ठेवलं. तिथून त्र्यंबकेश्वर गाठलं. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडलं. आता भीमाशंकर. तिथे भीमेचा- चंद्रभागेचा उगम. तेथून भीमेच्या काठाकाठाने विठ्ठल तुळापुरी आला. तिथे त्याला इंद्रायणी भेटली. तिच्या काठी असलेल्या आळंदीस आला. इंद्रायणीत स्नान केलं. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. तिथे त्याला खूप बरं वाटलं.
आळंदी म्हणजे अलंकापुरी. इंद्रायणीच्या सुंदर परिसराने जणू त्याला मोहिनी घातली. काही दिवस इथेच रहायचे या विचाराने विठ्ठलाने आपला दिनक्रम सुरू केला.
प्रातःसमयी तो लवकर उठे. इंद्रायणी जागी झालेली असे. स्नानसंध्या, अर्घ्यदानासाठी ब्रह्मवृंद इंद्रायणीकाठी जमलेले असत. ध्यानस्थ बसलेल्या विठ्ठलाकडे ते विस्मयाने पहात.
काळेकुळकुळीत केस, सावळा वर्ण, गुटगुटीत शरीर, तेजस्वी मूर्ती पाहून लोकांना समाधान वाटायचे. विठ्ठलाची ध्यानमग्न तेजस्वी मूर्ती सर्वांना मोहिनी घालीत होती.
ते सावळे रूप पाहून आळंदीतील लोकांना वाटले...
आला योगीराज आला
हरिनामाचे रव उच्चारित आळंदीस आला... ।। ध्रु. ।।
इंद्रायणीच्या पावन स्पर्श उन्मन होऊनी
निसर्गसुंदर परिसर देखुन प्रमोदित झाला,
आला योगीराज आला... ।।१।।
प्रातःकाळी मंगलवेळी रुद्रघोष करिता
आळंदीतिल सकल जनांना स्थितप्रज्ञ भासला
आला योगीराज आला... ।।२।।
ध्यान धरोनी सदा बैसतो इंद्रायणीकाठी
योग्यासम हा योग साधण्या पुण्यक्षेत्री आला
आला योगीराज आला... ।।३।।
रूप सावळे असे पाहुनी सिद्धोपंताला
प्रिय कन्येच्या शुभवराचा सुयोग हा वाटला
आला योगीराज आला... ।।४।।
तुळशीमाजी ओट्यावरती बकुळमाळ गुंफिता
शिवशक्तीच्या भेटीस्तव हा काळ सिद्ध झाला
आला योगीराज आला... ।।५।।