२०. करावी ज्ञानाची साधना

  सहाव्या अध्यायात ज्ञानराजांनी ध्यानयोगाचे वर्णन केले आहे. त्याच्या अनुषंगाने योगशास्त्र, याशिवाय अष्टांगयोग, त्याचे प्रकार सविस्तरपणे सांगितले आहेत.

  सातव्या अध्यायात ज्ञान आणि विज्ञानयोग कथन केले आहेत. आध्यात्मिक आणि आधिभौतिक, ग्राह्यग्राह्यविचार, दिसणारे व न दिसणारे असे सर्वांगांनी स्पष्ट केले आहे.

  ज्ञानाची साधना केल्याने कोणत्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात याचे समग्र वर्णन ज्ञानसाधनेत केले आहे....

जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधूनि मुक्त होई मानवा
करावी ज्ञानाची साधना... ।। ध्रु. ।।

शुद्धभक्तीच्या मार्गावरती विकल्प हे कंटक
कुमार्गाच्या वळणावरती जीवन ठेचाळत
ज्ञानप्राप्तीच्या साधनयोगे फलरस संभावना
करावी ज्ञानाची साधना... ।।१।।

संसाराच्या आडरानी या मोहाचे मधुबन
त्या मोहाच्या मागावरती भ्रमती अवघे जन
परमार्थाच्या कर्मज्ञाने मिळते समभावना
करावी ज्ञानाची साधना... ।।२।।

आयुभरल्या आसक्तीने दुःखच की उरते
मतिभ्रमाच्या पाशालागी शोका ये भरते
आत्मज्ञानातुनि लाभते भक्तीची प्रेरणा
करावी ज्ञानाची साधना... ।।३।।

षड्रिपूंच्या देहामाजी बीज अतृप्तीचे
त्या बीजाचा वृक्ष वाढता राज्य अनीतीचे
अद्वैत-ज्ञानातुन गवसते निर्मोही भावना
करावी ज्ञानाची साधना... ।।४।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२०. करावी ज्ञानाची साधना | गीत ज्ञानदेवायन