२१. आदि मी अन् अंत मी
आठव्या अध्यायात तारक (अक्षर) ब्रह्मयोग सांगितला आहे. सोऽहं म्हणजे मी आहे. सर्व काही मी आहे.
भगवंत सांगतात- सगळ्यात मी आहे, पण तरीही कशात नाही. म्हणजे सर्व ठिकाणी माझे अस्तित्व असूनही मी कशातच गुंतून पडत नाही. अशा प्रकारचे अध्यात्मज्ञान सांगताना भगवंत म्हणतात...
आदि मी अन् अंत मी, धर्म-अर्थ अन् काम मी
सत्त्व-रज-तम विकार मम, तरी न रंगे त्यात मी! ।। ध्रु. ।।
स्वप्नडोही मानवाच्या जागृतीही बुडत ना
नील व्योमी जलद येता नभ तरीही त्यात ना
पंकामाजी पद्म जैसे तैसाचि अलिप्त मी... ।।१।।
उदयास्ताच्या पुरामाजी जन्म मृत्यु हा कडा
उद्भवे व त्यात सहजे देहधारी बुडबुडा
माया-पुर हा तरावयासी बहुत ऐसा अवघडा
शरणागत जो अनन्यभावे धरिन संगे त्यास मी... ।।२।।
आर्त भजतो सदैव मजसी दुःख वारण्यासाठी हो
मुमुक्षु जो भाव वर्ततो ज्ञानप्राप्तीसाठी हो
अर्थार्थी तर नित्यच भजतो द्रव्यलाभासाठी हो
परंतु एकच ज्ञानी माझा नित्यही त्याचाच मी... ।।३।।