२२. निर्गुण निराकार मी
हा योग नवव्या अध्यायात सांगून पुढे म्हटले आहे, सर्व योगसाधन हेच मुख्य आहे. ज्याला हा योग साधला तो मुक्त झाला, पावन झाला.
दहाव्या अध्यायात विभूतिविस्तारयोग सांगितला आहे. अणूरेणूत परमेश्वर भरला आहे. याची जाणीव-ओळख होते. विभूतीचा अर्थच मुळी अवतार ! हा अवतार कसा आहे? निर्गुण-निराकार आहे...
निर्गुण निराकार मी, साकार आकारा
ये सृष्टीरूप विस्तारा... ।। ध्रु.।।
घृत होय थिजूनिया शेवटी, परंतु दुग्धच ते रोकडे
जळ धावे वळणाने गिरिकंदराते, परि न ते वाकुडे
स्वयमेवाच्या तत्त्वामाजी मोदच ये आकारा... ।।१।।
वृक्ष वाढे बीजातूनि, मागुती फलेषु तरुच ते बीज का ?
सुवर्णाचे अलंकार अनेक प्रकार, हेमच ते डाग का ?
भूषणमात्रे हृदयावरती झरती अमृतधारा... ।।२।।
नामकीर्तनात सारे भाव लुप्त होई, मुक्त तोचि होई हो
ज्ञानिया जो मनामध्ये भेदही न पाहे, मोद दिशा दाही हो
अस्तित्वाते उपासनाही बंध नुरे सारा... ।।३।।
तरंग जे पाण्यावरती, लाट म्हणे कोणी अलग नसे दोन्ही
तत्त्व अनंताचे जगी जाणी जो, विशाल तोचि जगत्पाल हो
स्वरूप तो ओंकाराचे सकलांचा आसरा... ।।४।।