२३. देखिले विश्वरूप देखिले

  परमेश्वर सर्वांभूती आहे. ज्ञानरायांनी यासाठी गोमट्या प्रतिमा वापरल्या आहेत.

  श्रीकृष्णांनी पार्थाला दिव्यदृष्टी दिली. दिव्यदृष्टीचा उजेड पडल्याबरोबर अर्जुनाची ज्ञानदृ‌ष्टी चहूकडे फाकली. एकदम ऐश्वर्य-तेजाचा उजेड पडून त्याला सर्वच चमत्कारमय दिसू लागले. सूर्याच्या तेजाने जसे चंद्र व तारे नाहीसे होतात, त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना विश्वरूपाने नाहीशी केली. त्याच्यापुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून, पुष्कळ रूपाने चहूकडे पसरली. पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे स्वरूप पाहून समाधान वाटले. लागलीच डोळे उघडून पाहतो तो, विश्वरूप दृष्टीस पडले. अपार असे जे विश्वरूप त्याचा आदि व अंत हे अर्जुनाने पाहिले. ज्या रूपाचा थांग वेदांनाही लागला नाही, त्याचे सर्व अवयव अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी पाहिले. 'देवा, तुमच्या रूपाला, आदि, मध्य व अंत हे तिन्हीही नाहीत. पृथ्वी जशी भूतमात्रांनी भरलेली आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, तसे तुमचे विश्वरूप मूतीनी भरलेले आहे असे दिसते. या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा आहे की ते सर्वत्र भरलेले दिसते. हजारो सूर्याचे तेज एकत्र व्हावे व प्रकाशच प्रकाश दिसावा, तसे त्या तेजाने अर्जुनाचे डोळे दिपून गेले. अर्जुनाला हे रूप असे भासले असेल !...

देखिले विश्वरूप देखिले
रूप हे विराट मी पाहिले...।। ध्रु. ।।

आदि-मध्याविरहित तुम्ही
चंद्रसूर्य हे नयनच दोन्ही
तमोरूपाने शासन करिता,
कृपाकटाक्षे पावन केले... ।।१।।

उजेड पडता प्रलयाग्नीचा
महाप्रखर ते तेज मुखावर
जिव्हा जैसी लोळ विजेचा,
विश्वरूप हे तेजच साकारलेले... ।।२।।

स्वर्ग, पृथ्वी अन् अंतरिक्षही
व्यापुन गेल्या दाही दिशाही
अद्भुत रूपे चौदा भुवने
साकारून हे अतयचि घडले... ।।३।।

रूप पाहता असे आगळे
पटले सारी विरून गेली
कर्मबीज हे जळता मोहे,
जीवित हे फलद्रूप झाले... ।।४।।

अनंत रूपे तुम्ही दाविली
शिवशक्ती अन् आदिमायेचे
जग हे तुम्हीच विस्तारले,
विश्वरूपातुन दर्शन घडले... ।।५।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२३. देखिले विश्वरूप देखिले | गीत ज्ञानदेवायन