२४. नाम त्याचे क्षेत्रज्ञ हो

  बाराव्या अध्यायात भक्तियोग सांगितला आहे. यानंतर तेरावा अध्यायात क्षेत्र-क्षेत्रज्ञयोग. क्षेत्र म्हणजे देह. देहाची व्यवस्था. देहात राहणारा आत्मा, तो जीवात्मा म्हणजे जीवशिव ऐक्य. या जीवाशिवाच्या ऐक्यालाच क्षेत्रक्षेत्रज्ञयोग असे म्हटले आहे. या देहामध्ये कोण कोण वसती करतात? याचे सुंदर वर्णन या अध्यायात केले आहे. हे शरीर म्हणजे सगळ्या वासना-विकारांची गुहा आहे. अहंकार, कर्म, बुद्धी अशी छत्तीस तत्त्वे यात सांगितली आहेत...

या देहाला क्षेत्रच म्हणती, जाणतसे योग जो
नाम त्याचे क्षेत्रज्ञ हो...।। ध्रु. ।।

अहंकार, कर्म, बुद्धी जैसे, इंद्रिये ती दहा
मन आणखी ज्ञानेंद्रिय जे, कर्मेंद्रिये ती महा
सुखदुःख, द्वेष संघ हे, छत्तिस तत्त्वे हो... ।।१।।

पृथ्वी, आप, तेज नि वायू पंचभूते ही महा
अहंकार अन् बुद्धीही, पापपुण्याची ती गुहा
प्रकृती हे नाव जयाचे, तेच अव्यक्त हो... ।।२।।

इंद्रियांच्या रजोगुणासह चमकत राही सदा
बुद्धीवरती मातच करिते द्वैताची आपदा,
निःसंशय ते मनच आपुले, अहंकार ते हो... ।।३।।

उपभोगाच्या आठवणींची झणी लागते तार
त्या वृत्तीच्या कुसंगतीने, बुद्धी होते ठार
ऐसी चंचल वेडी इच्छा वसते देही हो... ।।४।।

तेल-वात अन् अग्नीला हो दिवा लोक म्हणती
चराचराच्या सर्व व्याप्तीला जग हेच वदती,
छत्तीस तत्त्वे एके मिळूनी क्षेत्रच होते हो... ।।५।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२४. नाम त्याचे क्षेत्रज्ञ हो | गीत ज्ञानदेवायन