२५. मानवा, सुकृत आचरणे
अध्याय १४ वा, गुणत्रय विभाग- यात सत्त्व-रज-तम या साऱ्यांचे गुणवर्णन केले आहे. अज्ञानाच्या पोटी मानवी मनात ज्या वृत्ती वाढतात, त्यासच सत्त्व-रज-तम ही नावे आहेत. रज-तमाला जिंकूनच सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुणामुळेच बुद्धीही वाढत्ते, प्रगल्भ होते. त्यातूनच खऱ्या ज्ञानाचा उदय होतो.
अशा प्रकारे ही मालिकाच तयार झाली आहे. या तिन्ही गुणांचे वर्णन ऐकूया. त्यात सत्त्वगुण महत्त्वाचा, या सत्त्वगुणामुळेच काहीतरी सुकृत करू शकतो...
सत्त्व-रज-तम या गुणत्रयाचा विचार हा करणे
मानवा, सुकृत आचरणे...।। ध्रु. ।।
प्रवृत्तीच्या अंतःकरणी त्रयोगुण जन्मती
बाल, युवा अन् जरा अवस्था तिन्ही या असती
अज्ञानाच्या स्वीकारास्तव वृत्ती या वाढती
त्या वृत्तीला सत्त्व-रज-तम शब्दाने सांगणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।१।।
ज्या जीवाचे गुणापासुनी रंजनही होते
रजोगुण हे नाम तयाचे कामा जागविते
प्राप्तीस्तव संसार-स्वर्ग हे, कर्म करीत राहणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।२।।
अविचाराचा महामंत्र हा तमोगुण साचा
अज्ञानाचे मद्यपात्र हे मोह-अस्त्र आता
इंद्रियाते जडत्व अन् मूढत्व मना येता
अंधारासम या व्यापारा शून्यत्वच असणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।३।।
वेदबाह्य हे कर्म करणे हौस मना येते
सत्त्व-रजाचा लोप होऊनि तमा प्रबळ होते
निद्रा-आळस-प्रमाद तिन्ही ऐशा पाशाते
उपाधीरहित जीवाला या बंधन हे असणे
मानवा, सुकृत आचरणे ।।४।।
रज-तमाच्या गुणास जिंकुन सत्त्वगुण वाढतो
वसंत येता गंध फुलांचा चहूकडे जातो
प्राचीसम या अंतर्यामी ज्ञानसूर्य प्रगटतो
सकल गुणांचा, इंद्रियाने विचार हा करणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।५।।
पर्जन्याच्या काळी सरिता तुडुंबिनी वाहते
सत्त्वगुणाते शास्त्रामाजी बुद्धीही वाढते
व्योमप्रकाशी चंद्र त्यापरी, ज्ञानवृत्ती फाकते
अशी सारखी दिसू लागती सत्त्वगुण-लक्षणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।६।।
सत्त्वमूर्त ही बनून पुन्हा ज्ञान जन्म घेते
ज्ञान वाढता बुद्धी विचारी तरंगिणी होते
महत्तत्त्व हे आत्मस्वरूपी निमग्नचि सारे
सत्त्वगुणाच्या फलश्रुतीचे सुकृत हे लेणे
मानवा, सुकृत आचरणे... ।।७।।