२६. देवासुर संपत्ती

  पंधराव्या अध्यायात पुरुषोत्तमयोग सांगितला आहे. अहं ब्रह्मास्मि !

  अध्याय १६ वा, देवासुर संपद् विभाग-

  उत्तम, कनिष्ठ संपत्ती कोणती? आसुरी संपत्ती कोणती? दैवी संपत्ती कोणती ? देवी संपत्तीच कशी योग्य व फलदायी आहे याचे समग्र वर्णन यात केले आहे.

  १. सरळपणाने, न्याय मार्गाने मिळविलेली संपत्ती, ती दैवी संपत्ती होय. जिला सात्त्विकतेचा स्पर्श झाला आहे अशी संपत्ती. जी देवी ज्ञानाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे ती दैवी संपत्ती.
दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वास सुख देणारी तिलाच दैवी संपत्ती म्हणावे.
दैवी संपत्ती म्हणजे मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच होय. अशी ही दैवी संपत्ती, या सव्वीस गुणरूपी तीर्थांनी नित्य नवी असून वैराग्यरूपी सागराचा उद्धार करण्याकरिता जणू काय भगवती गंगाच प्राप्त झाली आहे.

  २. वाममार्गाने मिळवलेली ती आसुरी संपत्ती. या संपत्तीचा महिमा असा आहे की ज्याच्या योगाने अधोगती प्राप्त होते.
जीवांना भयंकर अशी नरकप्राप्ती करून देण्याकरिता घोर दोषांनी जी आपली जूट केली आहे, तीच ही आसुरी संपत्ती.
सगळी विषे एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकूट नाव द्यावे, त्याप्रमाणे आसुरी संपत्ती म्हणजे दोषांचा गोळाच होय....

एक होय जी हानिकारक दुजी ज्ञानप्राप्ती
अशी ही दैवासुर संपत्ती... ।। ध्रु. ।।

वाद्यावाचुन नाद ज्यापरी ऐकू ना येतो
पुष्पावाचुन मकरंद ना भ्रमराला मिळतो
देहामाजी आश्रय करिते तिज आसुरही वदती
अशी ही देवासुर संपत्ती... ।।१।।

आश्रय करिता मार्ग न जाणे पाप नि पुण्याचा
नोळखती जे मार्ग एकही प्रवृत्ती-निवृत्तीचा
शुचित्व कैसे स्वप्नी नसता, आसुरीच म्हणती
अशी ही दैवासुर संपत्ती... ।।२।।

मोक्षामागी मुमुक्षुसही सोबत जी करते
वाट चालता धर्मरूपाची मशाल जी होते
साह्यकारी जी सकला होते दैवी संपत्ती
अशी ही दैवासुर संपत्ती... ।।३।।

दैवरूपाने एके ठायी अवघे जे जमती
दैवगुणाते प्रभुत्व त्याला, अभय की वदती
जी सकलांना सूख देतसे, दैवी संपत्ती
अशी ही दैवासुर संपत्ती... ।।४।।

कर्म करिता ज्याचे अंगी अहंकार नुरतो
रजोगुण ना तमोगुण ना, विकल्प ना उरतो
'सर्वे सुखिनः सन्तु' तेथे दैवी संपत्ती,
अशी ही दैवासुर संपत्ती... ।।५।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२६. देवासुर संपत्ती | गीत ज्ञानदेवायन