२७. त्रयोगुणी श्रद्धा

  १७ व्या अध्यायात श्रद्धामय विभाग, सात्त्विक, राजस, तामस या गुणांचा विचार केला आहे.

  सर्व लोकांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या अंतःकरणाच्या गुणानुसार किंवा प्रकृती-स्वभावाप्रमाणे होत असते. जीव एखाद्या विशिष्ट श्रद्धेने युक्त असतो. ही श्रद्धा त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार असते. म्हणजे ज्याची ज्या गुणानुसार श्रद्धा असते, त्याप्रमाणे तो बनत असतो. जशा प्रकारचा आहार, तशा प्रकारची प्रवृत्ती बनत असते...

सात्त्विक-राजस-तामस ऐसी मनी वसे संपदा
जगतामध्ये अशी विहरते त्रयोगुणी श्रद्धा...।। ध्रु. ।।

दीप तेवता प्रकाश पसरे अवघ्या सदनाला
मोदे मिळते जलाशयातुन जीवन सकलाला
अशी सुखविते सान नि थोरा, ही सात्त्विक श्रद्धा... ।।१।।

रजोगुणाचा पिसाटवारा घुमे मनाच्या बनी
लोप पावते श्रद्धा तेव्हा कर्म संचरे मनी
कर्मच भजते असुराला मग, पिशाच्च भवती सदा... ।।२।।

पाण्यामधुनी जीवन फुलते नाव तया जीवन
दाहक मिरची तोंड भाजते दावी आपुले गुण
राजस प्राण्यामधे ठाकते रजोगुणी प्रमदा... ।।३।।

तमोगुणाची ठिणगी पडता जीवनवृक्षावरी
भंगूनि जाते भोळी श्रद्धा भोग भोगते त्वरे
तमोगुणाची किमया करते आमंत्रण आपदा... ।।४।।

कठोर होऊन पापे करिती दयाहीन असती
मुक्या जिवाचा वध करूनि बली त्यास देती
स्मशानतल्या अमंगळाचे दैवत पुजती सदा... ।।५।।

रजःतमाला जिंकुन जेव्हा सत्त्वगुण वाढतो
बसंतातल्या पर्णफुलांना गंध नवा येतो
तनामनाला सुखवित येते ही सात्त्विक श्रद्धा... ।।६।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२७. त्रयोगुणी श्रद्धा | गीत ज्ञानदेवायन