२८. कसा जाहला ?
अध्याय अठरावा हा शेवटचा अध्याय. यात मोक्षसंन्यास सांगितला आहे. समानधर्म सांगून, मोक्षाचा त्याग करावयास लावून शेवटी केवल ज्ञान कसे प्राप्त होते ते सांगितले आहे.
'ज्ञानेश्वरी' लिहून झाली. ज्ञानेश्वरांनी शेवटी पसायदान मागितले, ते स्वतःसाठी नाही तर सर्व प्राणिमात्रासाठी मागितले.
ज्ञानेश्वरांना वाटलं, सर्व संतांना, भक्तांना एकत्र जमवावं. काहीतरी नियम घालून द्यावा. त्यांनी सर्व संतांना व भक्तमंडळींना वारीचा नियम घालून दिला. हा वारीचा नियम अजून चालू आहे. पुढेही चालू राहणार आहे. मोठ्या चार एकादशी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या एकादशीस भक्तांनी पंढरीस आले पाहिजे.
लहानपणी वडिलांबरोबर पाहिलेला पंढरीचा पांडुरंग ज्ञानरायांना आठवला. ते देखणं रूप! निळासावळा विठ्ठल, त्याचा ध्यास लागला. कार्तिकी एकादशी जवळ आली होती. निवृत्तिनाथ, सोपान, मुक्ताई, चांगदेव असा सर्व भक्तजनांचा मेळा बरोबर घेऊन ज्ञानराज पंढरीस आले. तिथे नामदेव भेटले. जनाबाईही होती.
चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांचा अपार मेळा गोळा झाला. काल्याचं कीर्तन. त्यासाठी नामदेव उभे राहिले. नंतर ज्ञानदेवही अभंग गाऊ लागले. असे सर्वजण भक्तिरसात डुंबत होते. अवघ्या वारकऱ्यांच्या मनात ज्ञानदेवांनी अपरंपार प्रेम निर्माण केले.
नामदेवासह सर्व संतमेळा बरोबर घेऊन ज्ञानदेव उत्तरेकडे निघाले. सर्व तीर्थयात्रा झाल्या. प्रभास, द्वारका, गिरनार असे करीत करीत तो संतमेळा चारीधाम यात्रा करून पंढरपुरास परतला. परतताना वाटेत अरण या गावी सावता माळी भेटले. पंढरपुरात आल्यावर इतरही भक्तगण भेटले. विसोबा खेचर, नरहरी सोनार आदींची भेट झाली. वाळवंटात कीर्तनं होऊ लागली.
एके दिवशी कीर्तनात उभे असतानाच ज्ञानोबाराय म्हणाले, 'माझं येथलं काम संपलं आहे. मी माझ्या गावाला जाईन.' सर्वजण अवाक् झाले। ज्ञानरायाकडे नुसते पाहू लागले. ज्ञानराय म्हणाले, 'मी समाधी घेणार. आळंदीत.' निवृत्तिनाथ व सोपानाला काय बोलावे ते सुचेना. भावविव्हल होऊन मुक्ताईला शब्द फुटेना. तिचे मन म्हणू लागले...
भावुकतेने मुक्ताई तर वदे निवृत्तीला
कसा जाहला आज ज्ञानदा सज्ज समाधीला ? ।। ध्रु. ।।
ज्ञानियाचा निश्चय झाला
समजूत त्याची कोणी घाला
भावंडावर कैसा आला अवचित हा घाला?...।।१।।
हा ज्ञानाचा सूर्य आगळा
प्रकाश देईल सर्व जगाला
सूर्य लोपता संसाराला येईल रे अवकळा !... ।।२।।
हा ज्ञानाचा दीप लोपता
अंधारूनिया येईल सारे
अज्ञानाचे वादळवारे घेरील अवनीला... ।।३।।
हा ज्ञानाचा स्रोतच मोठा
शांतवील हो क्षुधा जगाची
ज्ञानाविण मग येईल भोंवळ साऱ्या दुनियेला... ।।४।।