४. शुभमंगल झाले !
आळंदीत सिद्धोपंत कुलकर्णी हे गृहस्थ रहात होते. त्यांची पत्नी गिरिजाबाई. त्यांना रुक्मिणी ही एकच मुलगी. पुत्राप्रमाणे त्यांनी आपल्या मुलीचा प्रतिपाळ केला होता. रुक्माई नक्षत्रासारखी सुंदर होती. तिचे सौंदर्य वरचेवर चंद्रकलेप्रमाणे वाढत होते. रुक्माई समजूतदार व शांत होती. चेहेऱ्यावर सात्त्विकतेचे भाव आणि बोलणं मवाळ होतं.
एके दिवशी मध्यरात्रीनंतर सिद्धोपंतांना स्वप्न पडले. स्वप्नात प्रत्यक्ष भगवंत बोलत होते, 'सिद्धोपंत, तुझ्या कन्येच्या लग्नाची तू का काळजी करतोस? तिला साजेसे स्थळ या आळंदीतच आहे. इंद्रायणीकाठी रहात असलेला विठ्ठल तुझ्या कन्येस योग्य वर आहे. वेळ दवडू नकोस. कामाला लाग.'
तिकडे इंद्रायणीकाठी रहात असलेल्या विठ्ठलालाही असेच स्वप्न पडले. प्रत्यक्ष पांडुरंग त्याला म्हणाले, 'विठ्ठला, तू माझा आवडता भक्त आहेस. तुझ्या मनात विरक्तीचे वादळ उठले आहे. अरे वेड्या, संसाराविना विरक्ती काय कामाची? विवाहाविना जीवन्मुक्ती नाही. विरक्ती सोडून विवाहबंधन स्वीकार. सिद्धोपंत कुलकणी यांची मुलगी तुझ्या विवाहास सिद्ध आहे. चल ऊठ, वेळ कशाला? तथास्तु !'
विठ्ठल जागा झाला. उठून पाहतो तर समोर सिद्धोपंत कुलकर्णी हात जोडून उभे. त्यांनी आपला परिचय करून दिला व येण्याचे प्रयोजन सांगितले. आपले स्वप्नही सांगितले. विठ्ठलानेही आपले स्वप्न सांगितले. दोघेही आनंदित झाले.
विठ्ठल हसत हसत म्हणाला, 'प्रत्यक्ष पांडुरंगानेच तुमची मुलगी स्वीकारण्याची मला आज्ञा केली आहे. भगवंताची आज्ञा कोण मोडणार?'
आणि एका शुभमुहूर्तावर...
शुभमंगल झाले, आज हे शुभमंगल झाले !
रुक्मिणीच्या भावजीवनी श्रीविठ्ठल आले...।। ध्रु. ।।
आपेगावचे ब्रह्मतेज ते आळंदीस आले
अन् मुग्धेच्या भावफुलांचे गंधमळे फुलले
त्रैलोकीचे जगन्नाथ हे अवनीवर प्रगटले
शुभमंगल झाले... ।।१।।
जरीबुट्याचा पिवळा शालू रुक्मिणी नेसली
सौभाग्याच्या लेण्यासह ही नवनवरी सजली
दृष्टीभेट तिज नवखी घडतां अष्टभाव दाटले
शुभमंगल झाले... ।।२।।
लग्नमंडपी सनईसंगे चौघडाहि वाजे
तेज भेटता दीपकळीला मनोमनी लाजे
जगाआगळा लग्नसोहळा इंद्रायणी बोले
शुभमंगल झाले... ।।३।।
सगे सोयरे दूरदूरचे कार्यासी आले
उपाध्याय अन् आप्तजनही सर्व तृप्त झाले
आनंदाचा असा सोहळा सहा दिवस चाले
शुभमंगल झाले... ।।४।।
कुर्यात सदा मंगलम्। सावधान... सावधान... !