५. अभागिनी झाले...
सुवर्ण-अलंकारांनी सजलेली नववधू रुक्मिणी विठ्ठलपंताबरोबर सासरी गेली. ती आनंदात होतो. आपला पती देखणा आहे, तो देवपूजा करतो, धार्मिक ग्रंथ वाचतो याची तिला धन्यता वाटायची. कालचक्र फिरत होते. आनंदी दिसणारी रुक्मिणी वरचेवर सुकत चालली. तिचे दुःख निराळे होते, न सांगता येण्यासारखे. विठ्ठलपंत संसाराबहल उदासीन असत. केवळ पांडुरंगाची आज्ञा आपण शिरसांवद्य मानली म्हणून आपण या संसारात अडकून पडलो. त्यांचा ओढा विरक्तीकडे होता. तीर्थयात्रा करावी, नाना देश पहावेत, संतसंगतीत कालक्रमणा करावी अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये घोळू लागले. ते सारखे सारखे म्हणत, 'मला काशीयात्रेला जायचंय, मला काशीयात्रेला जायचंय.' ऐकून ऐकून रुक्मिणी एकदिवस चिडून म्हणाली, 'तुम्ही रोजच म्हणता मला काशीयात्रेला जायचंय. तुम्ही जा, खरेच जा काशीयात्रेला, मी माहेरी निघून जाईन.'
आणि त्याच रात्री, रुक्मिणी झोपेत असताना, विठ्ठलपंत तडक बाहेर पडले. मजल दरमजल करीत, तीर्थस्थळे पहात पहात काशीला गेले. तेथे त्यांनी रामानंदस्वामीकडून दीक्षा घेतली.
पहाटे रुक्मिणी जागी झाली तेव्हा तिला जाणवले- खरेच ते गेले तीर्थयात्रेला ? काशीला गेले? आता माझे कसे होणार? माझे भाग्यच खोटे ! त्याला कोण काय करणार? गोविंदपंतांनी (सासरे) रुक्मिणीला तिच्या वडिलांकडे नेऊन सोडले.
स्वतःला भाग्यवान समजणारी रुक्मिणी अभागिनी झाली. ती स्वतःला विचारू लागली, 'माझे भाग्य कधी उजळणार? पण आज मात्र मी अभागिनी झाले...'
अभागिनी झाले, देवा, अभागिनी झाले ! दुर्देवाच्या फेऱ्यामध्ये आज कशी अडकले...।। ध्रु. ।।
सुवासिनी मी जैसी उमा
पतिव्रतेची सार्थ प्रतिमा
दुजी याहुनी नाही उपमा, पण दैव कसे फिरले?... ।।१।।
अंगणातल्या प्राजक्ताला
फूल एक ना आले
कठोर शासन नियतीने का उगाच मज दिधले?... ।।२।।
अजाणतेने उभ्या जीवनी
कळी न् कधी खुडली
अज्ञ मनाला दुखवायाचे पाप नसे घडले... ।।३।।
कसे वावरू या संसारी
कुसुमाविण वेली
पती जाहले हो संन्यासी, मी अभागिनी झाले... ।।४।।