६. नवल वर्तले !
विडूनपंतांनी संन्यास घेतल्याची वार्ता आळंदीत वाऱ्यासारखी पसरली. रुक्मिणीचे वडील सिद्धोपंत यांना अतीव दुःख झाले. ते म्हणाले, माझ्या मुलीच्या दुःखाला मीच कारणीभूत आहे. तो कोण ? कुठला? याची चौकशी न करता भगवंताचा दृष्टांत खरा मानून मी ही चूक करून बसलो. मुलीला म्हणाले, 'बाळ, तू धीर सोडू नकोस. ही सत्त्वपरीक्षा आहे. भगवंत-चिंतनात व तुळसी-प्रदक्षिणेत काळ घालव.'
त्या तुळसीजवळच मोठा अश्वत्थ वृक्ष होता. त्याच्यासह प्रदक्षिणा घालण्यात रुक्मिणीचा बराच काळ जाऊ लागला. आणि काय चमत्कार ! तिकडे काशीत रामानंदस्वामींना दृष्टांत झाला तुझी सेवा करीत असलेला हा चैतन्य पूर्वाश्रमीचा विठ्ठल आहे. त्याचा विवाह झालेला आहे. तो पळून आलेला आहे.
रामानंदस्वामीनी चैतन्याला बोलावून त्याची कानउघाडणी केली. त्याला म्हणाले, 'अरे, संसाराशिवाय जीवनाला मुक्ती नाही. तू गृहस्थाश्रमात परत जा. तुझी पत्नी तुझी वाट पाहते आहे.'
गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंत आळंदीला पोहोचले.
पहाटेची वेळ. रुक्मिणी दारात सडा टाकत होती. विठ्ठलपंतांना दारात पाहताच तिला आश्चर्य वाटले. तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. तिने स्वतःला चिमटा काढून पाहिला. तिचे मन आनंदाने नाचू-गाऊ लागले...
कसे अचानक नवल वर्तले !
पतिदेव आले घरी माझिया, देव आले मंदिरी...।। ध्रु.।।
भाग्यवेल ही फुलून आली
नवचैतन्ये सृष्टी न्हाली
आनंदाने उषा हासली अवचित मम दारी... ।।१।।
काय करावे काही सुचेना
जाऊ कशी मी सामोरी ?
मीच माझी नाही उरले, मोद न माये उरी... ।।२।।
आज जीवनी वसंत फुलला
मनःकोकिळा गाई गाणे
सौभाग्याचे माझे लेणे आले माझ्या घरी... ।।३।।
दुःखभोग हे सारे सरले
अभागिनीचे भाग्य उजळले
मन माझे बघ मोहरले, तृप्त होय अंतरी... ।।४।।