७. संसाराचा पाट मांडिला !
आळंदीतील ब्रह्मवृंदात कुजबूज सुरू झाली. सिद्धोपंतांना लोक म्हणाले, 'मुलीला व जावबाला घरी ठेवून घेतलेस तर आम्ही तुझे घर वाळीत टाकू.'
समाजाच्या लहरीखातर, त्यांच्या बोलापायी पापभीरू विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी सिद्धबेटावर एक झोपडी उभारली व तिथे त्यांनी संसार सुरू केला.
या सर्व प्रसंगाला इंद्रायणी साक्षी होती. ती गाऊ लागली...
संसाराचा पाट मांडिला फिरून सिद्धबेटी
आले गा परब्रह्म भेटी! ।। ध्रु. ।।
सुवासिनीच्या संसाराला पुन्हा मिळाली साथ
आसक्तीतून जशी विरक्ती तसे निवृत्तिनाथ
आले हो नाथपंथियासाठी... ।।१।।
प्राजक्ताला सुगंध यावा तैसे सात्त्विक थोर
शब्दसृष्टीचे परमेश्वर ते प्रकाश ज्ञानेश्वर
ऐसी आनंदाची दिठी... ।।२।।
आभा लेऊन चैतन्याची प्रज्ञा घेऊन ओंकाराची
स्वराकार मग स्वतः होऊनि आला असे सोपान
भवार्णवी जन तारण्यासाठी... ।।३।।
संसाराची पूर्ण प्रचीती पावन झाल्या चारी मुक्ती
जणू की आदिमाया शक्ती तैसी मुक्ताई जाहली
कैवल्याच्या मुक्तीसाठी... ।।४।।
ब्रह्मा, विष्णू, महेश आणिक आदिमाया धाकुटी
आळंदीही पावन झाली जग-उद्धारासाठी
आले हो देव-अंश पोटी... ।।५।।