८. निर्वाणीचा सवाल
विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांना चार अपत्ये झाली. पण आळंदीतील ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांशी सारे सारे संबंध टोडून टाकले. त्यामुळे त्यांची कुचंबणा होऊ लागली.
त्यांची चार अपत्ये म्हणजे चार नक्षत्रेच होती. ती अपत्ये म्हणजे शके ११९० मध्ये निवृत्तिनाथांचा जन्म झाला. हे पहिले अपत्य म्हणजे विठ्ठलपंतांची विरक्तीच साकारली जणू! ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर यांचा जन्म शके १९९३ मध्ये झाला. तिथी होती श्रावण वद्य अष्टमी.
त्यानंतर विठ्ठलपंतांचे भक्तिरूप म्हणजे सोपानदेव. यांचा जन्म शके ११९६ मध्ये झाला.
आणि नंतर मुक्ताई. शके ११९९ मध्ये मुक्ताई अवतरल्या. कष्टप्रद जीवन असताना सुद्धा ही बाळे तेजस्वी दिसत होती. या बाळांना सारे ब्रह्मवृंद 'संन्याशाची मुले' म्हणून हिणवत. समाजाकडून कुत्सित बोलणी, अवहेलना, छळ, कुचंबणा पदोपदी सहन करावी लागत होती.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना अतीव दुःख होत होते. आमच्या या बाळांचा काय गुन्हा ? शेवटी त्यांनी परमेश्वरालाच सवाल केला...
निर्वाणीचा सवाल तुम्हा करितो परमेश्वरा
आमुच्यावरती प्रहार होणे, न्याय तुझा का खरा ? ।। ध्रु. ।।
सुखदुःखाचा सागर लंघुनी
सहा रिपूंना पार करोनी,
आज येथला त्यजुनि किनारा, येतो माघारा... ।।१।।
ब्रह्मतेज मम गेही आले
सदन येथले पावन झाले
जीवनाच्या साफल्याचे सुख हेच ईश्वरा... ।।२।।
आजवरीची संकटगाथा
स्मरता होतो विनम्र माथा
तूच जगाचा आहे त्राता, पवित्र पावन खरा... ।।३।।
आज जरी हे घन अंधारी
प्रकाश देतील सर्व जगाला
त्यांच्यावरती स्नेहकृपेचा वर द्या करुणाकरा... ।।४।।
म्हणून वदतो निर्वाणीचे
तुम्हांस परमेश्वरा
वादळातल्या नौकेमाजी आज सुकाणू धरा... ।।५।।