अभिप्राय
कैवल्याचा पुतळा। प्रगटला भूतळा।
चैतन्याचा जिव्हाळा। ज्ञानोबा माझा ।।
अशी श्रद्धा, भावना केवळ नाथरायांचीच आहे, असे नाही तर श्रीनाथरायांनी ही भावना सकल श्रीज्ञानेश्वर-भक्तांसाठी निवेदन केली आहे.
महाराष्ट्राचे भाग्य अलौकिक असल्याने ज्ञानदेवांनी या भूमीवर जन्म घेऊन ती पावन केली.
ज्ञानेश्वर आणि 'ज्ञानेश्वरी' यांवर आतापर्यंत खूप लिखाण झाले आहे. त्याला पूर्णविराम नाही. ज्ञानदेवांचे उत्तुंग जीवन आणि तत्त्वज्ञान, प्रधान 'ज्ञानेश्वरी' ग्रंथ, अपूर्व अद्भुत आणि नवलाई आहे. तिचा गंध आणि सुगंध सर्वत्र दरवळत राहणार. ज्ञानदेवांचे केवळ जीवनगानही माणसाला 'लाभे आपुलीच मुक्तता' या जीवाच्या परमात्मभावनेने घेऊन जाते.
श्रीज्ञानेश्वर-भक्त श्री. पंडितराव सांबराव नायगावकर यांनी ज्ञानेश्वराचे जीवनगीत रेखाटले आहे. संतजीवनाचे स्मरण, त्यांचा नामोच्चार, त्यांचे चिंतन ही जीवाची खरी साधना आहे. ज्ञानदेवांनीच म्हटले आहेः-
तैसे हरपले आपणपे पावे। तै संतचि पाहता गिवसावे।
वानावे ऐकावे। तेचि पहा।।
हा सांगावाच गीतकार नायगावकरांनी अनुभवून शब्दविला आहे. या गीतांतील शब्दकळा ज्ञानदेवांचे दर्शन घडवितात.
संतांचे उच्च आणि उंच जीवन आकाशाहून वाढ असते. त्यांचे जीवन पुनः पुनः पहावयाचे ते आपल्याला त्यांच्या रूपात.
थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ।।
हा बोध म्हणजे जीवन्मुक्तीचा बोध होय. जीवन्मुक्ती हेच ज्यांचे ध्येय असते, कळो वा न कळो, पण ती अंतिम अवस्था आहे.
श्री. नायगावकरांच्या या तीस गीतांमधून श्रीज्ञानेश्वरांच्या चरित्र-वाणीला मोठ्या भावकतेने स्पर्श झाला आहे. हे 'गीत ज्ञानदेवायन' गेय तर आहेच, माणसाला अंतर्मुख करणारेही आहे.
श्री. नायगावकरांच्या या तीस गीतांमधून श्रीज्ञानेश्वरांच्या चरित्र-वाणीला मोठ्या भावकतेने स्पर्श झाला आहे. हे 'गीत ज्ञानदेवायन' गेय तर आहेच, माणसाला अंतर्मुख करणारेही आहे.
संत जीवनगान हे जीवनाच्या विश्रांतीचे, विसाव्याचे ठिकाण आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'आईके वाचा जेथ विसावे, ते साधुकथा।'
जीवाला विसावा मिळाला तर तो संतापायी असावा, तरच ती खरी विश्रांती असते.
अनेक वर्षांच्या चिंतनाचा परिपाक म्हणजे हे 'गीत ज्ञानदेवायन' आहे.
श्री. नायगावकर यांच्या समृद्ध लेखणीतून आलेली ही गीते वाचकाला आनंद, समाधान देतील यात शंका नाही.
श्री. नायगावकरांची लेखणी-वाणी अशीच संतजीवन रेखाटण्यात चंदनासारखी झिजो व लोकांना सुगंध देवो. श्री. नायगावकरांना अंतःकरणपूर्वक नमन.
श्रीज्ञानदेव त्यांना बुद्धिमत्ता देवो.
इति क्षेम.
सन्मित्र श्री. तात्या दीक्षित यांच्यामुळे हा गीतसंग्रह वाचता आला, त्यांना धन्यवाद !