अभिप्राय

  सुमारे चाळीस वर्षांपूवी आधुनिक वाल्मीकी कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या रससिद्ध लेखणीतून 'गीत रामायण' साकार झाले. यथावकाश सुधीर फडके यांनी त्या काव्याला स्वरसाज चढविला आणि ती काव्यमय रामकथा घराघरातल्या मराठी मनावर अधिष्ठित झाली. त्यानंतर माडगूळकरांच्याच लेखणीतून 'गीत गोपाल' सिद्ध झाले. रामकृष्णाच्या जीवनकाव्यांनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जीवनावर काव्य लिहिले जाणे अपेक्षित होतेच. सोलापूरचे कवी श्री. पं. सां. नायगावकरांना ते श्रेय द्यावे लागेल. 'गीत ज्ञानदेवायन'च्या रूपाने त्यांनी या काव्यनामावलीत एक उत्तम भर घातली आहे.

  कविता स्फुरणे हा प्रतिभेचा भाग आहे. केवळ शब्द जुळवून कविता तयार होत नाही. चित्रपटातले जुळवलेले गीत फार तर तयार होऊ शकते. अस्सल कवितेची नाळ अंतःप्रेरणेशी जोडलेली असते आणि अंतःप्रेरणा प्रतिभेशिवाय साध्य होऊ शकत नाही. कवितेच्या संदर्भात अशी अंतःप्रेरणा जेव्हा व्यक्त होते ती शब्दांचा आधार घेऊनच !

  ग. दि. माडगूळकरांना एकदा एका मित्राने विचारले, "तुम्हाला कविता कशी स्फुरते?" माडगुळकरांनी चट्कन उत्तर दिले, "वृक्षाला पालवी फुटते तशी !"

  अशाच अंतःप्रेरणेतून कविवर्य नायगावकरांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे जीवन गीतबद्ध करावेसे वाटले. ही गोष्टी सोपी खासच नव्हती. परंतु 'ज्ञानेश्वरी'चे गाढे अभ्यासक श्री. आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या प्रेरणेमुळे ज्ञानदेवांचे काव्यमय जीवन रेखाटणे ही श्री. नायगावकरांची सुप्त आंतरिक इच्छा फलद्रूप झाली, असेच म्हणावे लागेल. 'गीत ज्ञानदेवायन' प्रस्तुत पुस्तकातील तीस गीतांमधून व्यक्त झाले आहे. कोणत्याही विषयाची, प्रसंगाची बव्हंशी अनुभूती वाचकांना येणे यात लेखकाचे कसब असते. जितकी प्रतिभा अधिक तितकी प्रत्ययकारिता अधिक ! अशी प्रत्ययकारिता कवीला नक्कीच साधली आहे. प्रत्येक गीत साकार करतानाची कवीची मनोभूमिका अतिशय भावपूर्ण आणि विनम्र आहे. शब्दाशब्दात भक्तीचा ओलावा आहे. कवीने प्रत्येक गीताचा आशय त्यापूर्वीच्या निवेदनातून स्पष्ट केलेला आहे.

  गोविंदपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी नीराबाई अर्थात् ज्ञानदेवांच्या आजी- आजोबापासून निवेदनाला प्रारंभ होतो. भरतवाक्य अर्थात्च ज्ञानेश्वरांच्या समाधिसोहळ्याचे !

  काव्यमय जीवन मांडण्यापूर्वी कवी इंद्रायणीचे हृदगत् सांगतोः-

गतकाळातिल आज आठवे भावआगळी व्यथा
सांगते इंद्रायणी ही कथा...

  इथून प्रारंभ होतो आणि

स्वानंद समाधी घेतली निवांत। लाभला एकांत ज्ञानिया हो।।

  या ओळींनी कळस चढतो. थोडक्या पृष्ठांमधून कवी आपल्याला फार मोठी प्रत्यकारिता देऊन जातो.

  विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर त्यांची पत्नी रुक्मिणी म्हणते, 'कसे वावरु या संसारी, कुसुमाविण वेली!' निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताई या गोजिरवाण्या बालकांचा त्याग करून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई देहत्याग करतात तेव्हा कवी म्हणतोः-

इंद्रायणीच्या डोही येता, स्तब्धच ते जाहले
दूरदूर त्या झोपडीकडे मूकपणे पाहिले
देह त्यागिले त्या दोघांनी, जीवन ते सरले
इंद्रायणीचे जळही तेव्हा अवचित थरथरले

  अशा काव्यपंक्ती वाचकांना निश्चितच भावतील. पैठणच्या धर्ममार्तंडासमोर केलेले चमत्कार, चांगदेव-भेट, ज्ञानेश्वरी-कथन आणि सर्वात महत्त्वाचा ज्ञानेश्वर समाधिसोहळा यांसारख्या प्रसंगांना कवीने मोजक्या शब्दांत उत्तम साज चढविला आहे. त्याचबरोबर 'ज्ञानेश्वरी'चे सार सुद्धा या काव्याविष्कारामधून वाचकांची तृप्ती करते. या गीतांना स्वरसाज चढविल्यास नक्कीच मणिकांचनयोग जुळून येईल.

  श्री. पं. सां. नायगावकरांनी प्रस्तुत पुस्तक सेवाभावी वृत्तीने लिहिले आहे, ही गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. कविवर्य विं. दा. करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावेत

  अशाच निष्काम वृत्तीतून कवी नायगावकरांनी 'गीत ज्ञानदेवायन' दिले आहे. त्यातले हवे ते घ्यावे ! कवीने ही गीतसेवा प्रभुचरणी अर्पण केली आहे. हा गीतास्वाद घेताना ज्ञानदेवांच्या संपूर्ण जीवनाचे विहंगावलोकन केल्याचा आनंद वाचकांना निश्चितच मिळेल. त्यांच्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

- राजेंद्र खेर
मागील अभिप्रायअनुक्रमणिका
अभिप्राय - राजेंद्र खेर | गीत ज्ञानदेवायन