१०. पाऊस
नाही पाऊस पाऊस
नदी-नाले वृक्षवेली
गेले सुकूनिया सारे
पाण्याविना
नाही पाऊस पाऊस
जमिनीला पडे भेगा
पाण्यासाठी दूर रांगा
माणसांच्या
नाही पाऊस पाऊस
वरुणाचा होई कोप
थेंब येती आपोआप
डोळियांत
नाही पाऊस पाऊस
राहे लागूनिया ध्यास
कसा येईल तो दिस
भविष्याचा
कुठे दडला पाऊस
कुण्या देशामाजी गेला?
प्राण सुकूनिया गेला
सकलांचा
यावा पाऊस पाऊस
मना लागलीसे आस
कधी येईल तो दिस
सोनियाचा
आले भरून आभाळ
उभे गर्जले रानोमाळ
सारे पालटले भाळ
प्राणियांचे
आला गर्जत पाऊस
पडे अमृताच्या धारा
पुलकित होई धरा
समाधाने
असा पडता पाऊस
होई धरा शांत धुंद
सुटे आनंदाचा गंध
मातीलाही
जुलै १९७२