९. अरे पावसा
अरे पावसा पावसा
किती बघावी वाट
रात्र नि दिवसा?
अरे पावसा पावसा
किती लावतो उशीर,
जीव होतसे अधीर
अरे पावसा पावसा
जरा पाही तू वळून
धरा सांगे कळवळून
अरे पावसा पावसा
आसावले मन भोळे,
लागे आभाळासी डोळे
अरे पावसा पावसा
कसा अजून येईना
उडे साऱ्यांचीच दैना
अरे पावसा पावसा
नको रे अंत पाहू,
डोळे लागती वाहू
अरे पावसा पावसा
कुण्या देशामाजी गेला,
जीव व्याकुळ जाहला
अरे पावसा पावसा
किती करावी विनवणी?
माझी थकली रे वाणी
अरे पावसा पावसा
जरा येऊ दे करुणा,
पाणी भरू दे धरणा
अरे पावसा पावसा
किती पाहतोस अंत?
धरा करी रे शांत
अरे पावसा पावसा
का रुसला आम्हावर,
आता येई रे लवकर
१२.७.२००२
प्रसिद्धी : सोलापूर आकाशवाणी आषाढस्य प्रथम दिवसे!