११. वाट

वाट किती रे पाहू सजणा,
वाट किती पाहू?
तप्त उन्हाचे चटके आता
कुठवर मी साहू?...

तो वैशाखाचा सरला तप्त उन्हाळा
बघ आषाढ गेला, कोरडाच की काळा,
ते पाहुन उठती उरात दाहक ज्वाळा
या ज्वाळांना शांत कराया येई रे धावू...

हा कृषीवल बसला लावून वरती डोळे
अन् चाऱ्यावाचून मुके जीव तळमळे
ती तडफड त्यांची पाहुन काळिज उले
उदासवाणा परिसर ऐसा, डोळे लागती वाहू...

ही युगायुगांची अक्षय आपुली नाती
बघ आतुर झाली तुझियासाठी धरती
काळवेळ ना पाहू आता, येई दिवसा-राती
आगमने तव हर्षित होऊन गीत खुषीने गाऊ...

९.९.२००३
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
११. वाट | सृष्टीचे हे रूप आगळे