१२. पाऊस का रुसला?
पाऊस का रुसला आम्हावर
पाऊस का रुसला?
दूर दूर त्या अज्ञ ठिकाणी
दडून का बसला?
किती करावी तुझी याचना?
मंदिरातही चाले प्रार्थना
जपजाप्य अन् यज्ञही नाना
पण, उपाय का फसला?
वरुणराज रे तुलाच म्हणती
ऋषिमुनीही स्तोत्रे गाती
दैवतास अभिषेकही करती
अक्षय नाते तुझे धरेशी,
आज कसा विसरला?
घनमेघांची तुझी गर्जना
बिजलीच्या अद्भुत नर्तना
उशीर आता लावु नको ना
गर्जत बरसत येई वरुणा
भेट दे धरणीला!
१८.८.२००३