१३. वर्षा

स्वर्ग-धरेचा शालू नेसुन
घन-मेघांची चोळी घालुन
बिंब रवीचे भाळी लेऊन
इंद्रधनूचा गजरा माळुन
लहरत विहरत कधी येणार?

पायी पैंजण जललहरींचे
कटी मेखला नवरत्नांची
कंठी माला दवबिंदूंची
बांधुनी कंकण नक्षत्रांचे
हासत नाचत कधी येणार?

सप्तसुरांच्या तालावरती
नवरसांचे करीत गायन
सागराचे तांडव नर्तन
पदन्यास तो सौदामिनीचा
गर्जत बरसत कधी करणार?

टपटपचे सूर निनादीत
मृण्मयतेचा सुगंध उधळित
वसुंधरेला करीत पुलकित
प्रसन्न वर्षा झणी येणार!

३१.१०.१९६०
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१३. वर्षा | सृष्टीचे हे रूप आगळे