१४. ओढ दर्शनाची
आज या पावसानं
कसा घातला धुमाकूळ,
पाण्याखाली गेलं आता
पुंडलिकाचं राऊळ
नदी भरली चंद्रभागा
आला आला महापूर
विठ्ठलाच्या दर्शनाला
मन होतसे आतूर
वरून ये संतत धार
खाली भक्तांचा सागर
चाले पंढरीची वाट
संतजनांची वहिवाट
काही उपाय चालेना
पाऊस थांबता थांबेना
कसे आवरू या मना
देवा येऊ दे रे करुणा
नाही पर्वा पावसाची
ओढ लागे दर्शनाची
टाळ-मृदुंगाच्या तालात
मन रंगे अभंगात
आले आले महाद्वार
दिसू लागले शिखर
रूप सावळे सुकुमार
टेकू माथा समचरणावर...
जुलै १९६१