१५. श्रावण आला
घनगर्जत तो आषाढ गेला
रिमझिमणाऱ्या जलधारांसह
नवसंजीवन घेऊन संगे
श्रावण आला, श्रावण आला...
वसुंधरेला करीत पुलकित
हरिततृणांची मखमल पसरित
पर्णफुलांचे लेऊन मंदिल
आनंदाचा घेऊन झेला, श्रावण आला, श्रावण आला...
हिंदोळ्यावर बसून आता
गोडगोजिरी पंचिम आली
जनीमानसी धांदल झाली
नवेपणाचा लेऊन शेला, श्रावण आला, श्रावण आला...
रिमझिम रिमझिम धारेमधुनी
प्रकाशकिरणे झणी प्रकटती
इंद्रधनू मग क्षितिजावरती
उन्मेषासह सज्ज होऊनी, श्रावण आला, श्रावण आला...
चराचरासह सारी सृष्टी
नवतेजाची आभा ल्याली
नवगंधाने धुंद होऊनी
खुलवीत सौंदर्याला, श्रावण आला, श्रावण आला...
१९६१