१८. इंद्रधनू

इंद्रधनू ग इंद्रधनू
नभी प्रकटते इंद्रधनू
रिमझिमणाऱ्या धारेमधुनी
मुक्त उधळिते रंग जणू!

रंगित वसने लेऊन सजल्या
इंद्रपुरीच्या कुणी अप्सरा
निळ्या आकाशी कमान करूनी
सहज दाविती रंगकळा ऽ

नंदनवनिच्या फुलाफुलांचा
विविधरंगी गजरा माळुन
स्वागतास ती सिद्ध होतसे
वर्षाराणी अशी पहा !

स्वर्गामधल्या प्रवेशद्वारी
दवबिंदूंची माला सजवुन
चराचराला सुखवित आली
सृष्टीदेवी आज अहा !

त्या रंगाचा, त्या गंधाचा
स्पर्श वाटतो हवा हवा
त्या गंधाच्या नवेपणातुन
मनी उमलतो अर्थ नवा !

१७.७.१९८४
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१८. इंद्रधनू | सृष्टीचे हे रूप आगळे