१९. वसंत आला

नवगंधाने गंधित होऊन
आगमनाने प्रमुदित होऊन
अनिल हासत वदला
आला वसंत हा आला...

आंबेराईमध्ये कोकिळा
आलापित ती मधूरवाला
कुहुकुहूच्या निनादाने
आसमंत बघ धुंद जाहला
आला वसंत हा आला...

स्वप्न उद्याचे नव आशांचे
विविधरंगी फुलावयाचे
वृक्षलता त्या बनून स्वप्निल
नवपर्णाचे लेऊन मंदिल
आला वसंत हा आला...

सान झऱ्याचे झुळझुळ गाणे
खगही गाती आनंदाने
धुंद होऊनी वने-उपवने
हासत डोलत वदती सकला
आला वसंत हा आला...

शिशिरासह ते जुने संपले
नवचैतन्याने सृष्टी डोले
जनी मानसी निसर्ग वदला
फुलवित सौंदर्याला
आला वसंत हा आला...!

१९.१२.१९७९
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१९. वसंत आला | सृष्टीचे हे रूप आगळे