२०. कोकिळा

अंगणातल्या आम्रतरूवर
कशी आली ग कोकिळा!
रंग काळा नि सावळा
परी तिचा गोड गळा

वसंताचे आगमन
तिला कसे हो कळले!
आज आंबेराईत
तिचे पाऊल वळले

चाहुलीने वसंताच्या
वृक्षवेली बहरल्या
चैत्राच्या आगमने
नव आशा पालवल्या

गुढीपाडव्याला
साखरेचे गोड हार
देवाजीच्या नैवेद्यात
कडुनिंबाचा मोहोर

वसंत येता जीवनी
आनंदा ये भरते
वसंत-कोकिळेचे
कैसे अतूट हो नाते !

१.४.२००५, शुक्रवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
२०. कोकिळा | सृष्टीचे हे रूप आगळे